#RamMandir This is the fruit of thirty years of hard work .. | Sarkarnama

#RamMandir तीस वर्ष संघर्षाच्या मेहनतीचे हे फळ आहे..

वृत्तसंस्था
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजन होत असताना आज देशभरात आनंदाचे वातावरण आहे. अनेक शतकांची इच्छा या निमित्ताने आज पूर्ण होत आहे.

अयोध्या : "तीस वर्षाच्या संघर्षाच्या मेहनतीचे हे फळ आहे," अशा भावना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केल्या. राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. अयोध्येतील ऐतिहासिक आणि भव्य अशा राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज दिमाखदार सोहळ्यात झाले. या वेळी मोदी यांच्यासोबत उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम जन्मभूमी ट्रस्टचे नृत्यगोपालदास महाराज आदी उपस्थित होते. 

मोहन भागवत म्हणाले, "रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजन होत असताना आज देशभरात आनंदाचे वातावरण आहे. आजचा दिवस खूप आनंदाचा दिवस आहे. अनेक शतकांची इच्छा या निमित्ताने आज पूर्ण होत आहे. जगात शांती प्रस्थापित करण्यासाठी आपल्या मनाची अयोध्या बनवायला पाहिजे." योगी आदित्यनाथ म्हणाले, "या क्षणाची अनेक वर्षापासून वाट पाहत होतो. मंदिर उभारण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. आज मंदिराचे भूमिपूजन होत असल्याने पाचशे वर्षापूर्वीचे स्वप्न पूर्ण झाले आहे." 

या सोहळ्याचे पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांनी सांगितले की, राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी नऊ विटा भूमिपूजनाच्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. या विटा भगवान रामाच्या जगभरातील भक्तांनी 1989 मध्ये पाठविल्या आहेत. अशा प्रकारे 2 लाख 75 हजार विटा पाठविण्यात आल्या होत्या. त्यातील 'जय श्री राम' लिहिलेल्या शंभर विटा भूमिपूजनासाठी निवडण्यात आल्या होत्या. 

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सुरू असताना कीर्तनही सुरू होते. मोदी यांनी सुरुवातीला पुष्पांजली वाहिली. त्यानंतर मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजनाची वीट ठेवण्यात आली होती. यानंतर मोदी यांनी भूमीवर मस्तक टेकवून नमस्कार केला. तसेच, सर्वांना अभिवादन केले. आता काही वेळात पंतप्रधान देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

संपूर्ण देशाचे लक्ष आज अयोध्येकडे लागले आहे. देशभरात राम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ऐतिहासिक आणि भव्य-दिव्य अशा राममंदिराच्या भूमिपूजन समारंभासाठी अवघी अयोध्या नगरी सजली आहे. शरयू तीर भगव्या रंगामध्ये न्हाऊन निघाला आहे.

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येसह लगतच्या भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाहेरील कोणत्याही व्यक्तीस शहरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. मंदिराच्या या भूमिपूजन कार्यक्रमासाठी १७५ मान्यवरांना निमंत्रण दिले असून, त्यात १३५ संतांचा समावेश आहे. या सोहळ्यानिमित्त अयोध्येत ५१ हजार लाडूंचे वाटप होणार असून, भूमिपूजनात सहभागी पाहुण्यांना चांदीचा शिक्का भेट देण्यात येईल. 

या कार्यक्रमासाठी योगगुरू रामदेवबाबा आज अयोध्येत दाखल झाले आहेत. ते रामजन्मभूमी स्थळी पोचले आहेत. आता देशात खरी रामराज्याची स्थापना होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, आपण राम मंदिराचा कार्यक्रम पाहत आहोत, ही सर्वच भारतीयांसाठी भाग्याची घटना आहे. अयोध्येत आता पतंजली योगपीठ भव्य असे गुरुकुल उभारणार आहे. या ठिकाणी जगभरातून येणारे लोक वेद आणि आयुर्वेदाचा अभ्यास करु शकतील. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख