तो नेता दोन हजार रुपयांसाठी कुठेही जातो : भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य - Rakesh Tikait goes anywhere for two thousand rupees says BJP MLA | Politics Marathi News - Sarkarnama

तो नेता दोन हजार रुपयांसाठी कुठेही जातो : भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

शेतकरी आंदोलनावरून भाजप व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेत्यांकडून शेतकरी नेत्यांवरही टीकास्त्र सोडले जाते.

लखनऊ : शेतकरी आंदोलनावरून भाजप व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेत्यांकडून शेतकरी नेत्यांवरही टीकास्त्र सोडले जाते. शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावरही भाजपकडून टीकेची झोड उठविली जाते. त्यातच भाजपच्या एका आमदाराने राकेश टिकैत हे दोन हजार रुपयांसाठी कुठेही जातात, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचे दोन महिन्यांहून अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे. त्यांच्यावर टीका करताना गाझियाबाद येथील भाजपचे आमदार नंद किशोर गुर्जर यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, मी भारतीय किसान यूनियनच्या नेत्यापेक्षा मोठा शेतकरी आहे. कारण माझ्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त जमीन आहे. टिकैत केवळ दोन हजार रुपयांसाठीही कुठेही जातात. 

शेतकरी आंदोलनावर बोलताना गुर्जर म्हणाले, कोण म्हणते हे शेतकरी आहेत. तिथे जाऊन पहा. राजकीय पक्षांशी संबंधित लोक तिथे बसले आहेत. ते शेतकरीही असू शकता आणि मजूरही. टिकैत यांनी माफी मागायला हवी. ते देशातील शेतकऱ्यांना विभागू शकत नाहीत, अशी टीका गुर्जर यांनी केली आहे. 

टिकैत यांनी गुर्जर यांच्यावर धमकावण्याचा आरोप केला आहे. मागील आठवड्यात आंदोलनाचे ठिकाण सोडण्याचा दबाव टिकैत यांच्यावर आणण्यात आला होता. त्यानंतर टिकैत माध्यमांशी बोलताना भावूक झाले होते. आंदोलन मागे घेण्यासाठी षडयंत्र केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

या आरोपावर बोलताना गुर्जर म्हणाले, मी टिकैत परिवाराचा सन्मान करतो. पण काही लोक म्हणतात की राकेश टिकैत तर दोन हजार रुपयांसाठीही कुठेही जातात. हे खूप दुर्दैवी आहे. त्यांनी असे करू नये. शेतकरी आंदोलनावरून तुम्ही वाद निर्माण करू नका. आंदोलन शांततेत व्हायला हवे. 

खासदारांना गाझीपूर सीमेवर रोखले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक खासदार आज गाजीपूर सीमेवर, शेतकरी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले होते. मात्र, त्याना गाझीपूर सीमेवर अडवले. आंदोलनस्थळावर जाण्यापासून त्यांना रोखण्यात आले. 

सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी संसदेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी सुळे यांच्यासह देशभरातील अनेक खासदार दिल्लीच्या गाझीपूर बॅार्डवर शेतकर्यांच्या आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. मात्र, या सर्वांना दिल्ली पोलिसांनी या सीमेवरच अडवण्यात आले. 

शेतकरी आंदोलनाला भेट देण्यासाठी देशातील विविध राज्यातील दहा पक्षांचे खासदार एकत्र आले होते. सर्व खासदारांनी मिळून आंदोलनस्थळी जाण्यासाठी पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे सर्व खासदार आंदोलकांना न भेटताच परतले आहेत. 

Edited By Rajanand More

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख