जयपूर : राजस्थानचे उद्योगमंत्री प्रसादीलाल मीणा यांनी महिलांच्या स्वच्छतागृहाचा वापर केल्याचे समोर आले आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये ते स्वच्छतागृहातून हात धुवून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यानंतर एक महिलाही स्वच्छतागृहात असल्याचे व्हिडिओत दिसते.
उद्योगमंत्री प्रसादीलाल मीणा काही दिवसांपूर्वी दौसा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एका महिलांच्या स्वच्छतागृहाचा वापर केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यावरून भाजपसह नेटकऱ्यांनीही मीणा यांची खिल्ली उडविली आहे. तसेच या प्रकारावरून मीना यांच्यावर जोरदार टीकाही होत आहे.
ये हैं कांग्रेस पार्टी (@INCIndia) के संस्कार राजस्थान सरकार के उद्योग मंत्री प्रसादी लाल मीणा (@PLMeena_lalsot) महिला शौचालय का अच्छे से सदुपयोग कर रहे हैं
वाह री @ashokgehlot51 सरकार pic.twitter.com/sG34XzMoHL— Naveen Kumar (@naveenjindalbjp) February 19, 2021
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मीणा हे महिला स्वच्छतागृहात हात धुवत असल्याचे दिसते. हात धुतल्यानंतर ते बाहेर येतात. त्यानंतर काही सेकंदातच एक महिलाही स्वच्छतागृहात दिसून येते. स्वच्छतागृहाबाहेर यावेळी जमलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ काढला आले. मीणा बाहेर आल्यानंतर काही जण त्यांच्याकडे याबाबत विचारणाही करतात. पण मीणा त्याकडे फारसे लक्ष देत नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.
हेही वाचा : माझ्यावर दया करा, फाशी रद्द करा! शबनमची दया याचिका...
केवळ १९ सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. त्यावर भाजपनेही टीका केली आहे. दिल्ली भाजपचे मिडिया प्रमुख नवीन कुमार यांनी या व्हिडिओ शेअर करून काँग्रेसवर टीका केली आहे. ''हे आहेत काँग्रेस पक्षाचे संस्कार. राजस्थान सरकारचे उद्योगमंत्री प्रसादी लाल मीणा महिला स्वच्छतागृहाचा चांगला सदुपयोग करत आहेत. वाह रे गेहलोत सरकार,'' अशी टीका नवीन कुमार यांनी केली आहे.
भाजपचे प्रवक्त लक्ष्मीकांत भारद्वाज यांनीही मीणा यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ''मंत्र्यांनी मर्यादेचे भान ठेवायला हवे. मंत्रीच महिलांच्या सन्मान करणार नसतील तर दुसऱ्यांकडून काय अपेक्षा करणार. एका पुरूष मंत्र्याने जाणीवपूर्वक महिलांच्या स्वच्छतागृहाचा वापर करणे, हे काय सिद्ध करते,'' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Edited By Rajanand More

