अंबानींच्या 'ऍन्टीलिया'नंतर केरळमध्ये रेल्वेत स्फोटकं सापडल्याने खळबळ - Railway Protection Force seizes more than 100 gelatin sticks in keral | Politics Marathi News - Sarkarnama

अंबानींच्या 'ऍन्टीलिया'नंतर केरळमध्ये रेल्वेत स्फोटकं सापडल्याने खळबळ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर काल सायंकाळी एका गाडीत जिलेटीनच्या 25 कांड्याही सापडल्या आहेत.

तिरुअनंतपुरम : प्रसिद्ध उद्योगपती, रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ऍन्टीलिया या घराजवळ काल स्फोटकं आढळून आली. त्यानंतर आज केरळमध्ये एका रेल्वेत स्फोटकं सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

अंबानी यांच्या घराबाहेर काल सायंकाळी एका गाडीत जिलेटीनच्या 25 कांड्याही सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांनी जिलेटीन असलेली कार अंबानी यांच्या घराजवळून हटवली आहे. तर पोलिसांना गाडीत मिळालेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, 'ये सिर्फ ट्रेलर है.. नीता भाभी, मुकेश भैया...फॅमिली येतो झलक है ! इंतजाम हो गया है!संभल जाना..'. त्यामुळे या घातपाताचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

या घटनेनंतर केरळमध्ये एका प्रवासी रेल्वेत महिलेकडे जिलेटीनच्या 100 कांड्या व 350 डिटोनेटर सापडल्या आहेत. कोझीकोड रेल्वे स्थानकात चेन्नई मंगलापुरम एक्सप्रेसमध्ये  रेल्वे सुरक्षा दलाने ही स्फोटके जप्त केली आहेत. संबंधित महिलेला अटक करण्यात आले आहे. विहीर खोदण्यासाठी जिलेटीन नेत असल्याचा दावा महिलेने केला आहे.  

दरम्यान, अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. गुन्हे शाखेकडून एकूण 8 ते 10 पथक तयार करण्यात आली आहेत. स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याने मुंबईतील सर्व यंत्रणा अलर्ट झाली आहे. रात्री दहशतवादी विरोधी पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. सीसीटीव्ही ज्या दुकानातून मिळाला तिथून हार्डडिस्क ताब्यात घेण्यात आली आहे. 

मुंबई पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीमही अंबानींच्या बंगल्याबाहेर तैनात करण्यात आली आहे. सुपर पावर डेझर एक्सप्लोजिव २५ एम एम, १२५ ग्रँमसोलर, इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 'डो बाजारगाव नागपूर' असे लिहिलेल्या १९ जिलेटिन कांड्या, बनावट नंबर प्लेट आदी साहित्य या गाडीत सापडले आहेत. 

हेही वाचा : नीता भाभी, मुकेश भैया...फॅमिली येतो झलक है...

देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुंबईत उच्चभ्रू वस्तीत ऍन्टीला नावाचे घर आहे. या घराच्याजवळ काल सायंकाळी एक संशयित कार आढळून आली आहे. या कारमध्ये जिलेटीनच्या कांड्याही असल्याची माहिती पुढे आली आहे. जिलेटनिच्या कांड्या फॉरेन्सिक टीमला सापडल्या आहेत. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी लवकरच सत्य बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केला. सापडलेली गाडी आणि अंबानी यांच्या गाडीचा क्रमांक एकच असल्याचीही माहिती पुढे येत आहे. अंबानी यांना केंद्र सरकारने झेड प्लस ही सुरक्षा दिली आहे. तसेच त्यांची वैयक्तिक सुरक्षा व्यवस्थादेखील काटेकोर आहे. 

शेतकरी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सध्या आंदोलन आहे. या आंदोलनात मुकेश अंबानी आणि अडाणी हे दोन उद्योगपती लक्ष्य करण्यात आले होते. या आंदोलनात खलिस्तानवाद्यांचा हात असल्याचा आरोप करण्यता येत होता. ही बाजूही पोलिस तपासात पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

Edited By Rajanand More 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख