#किसान विरोधी नरेंद्र मोदी ; शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनविण्याचा प्रयत्न.. - Rahul Gandhi's criticism of Narendra Modi on the Agriculture Bill | Politics Marathi News - Sarkarnama

#किसान विरोधी नरेंद्र मोदी ; शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनविण्याचा प्रयत्न..

वृत्तसंस्था
रविवार, 20 सप्टेंबर 2020

नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध सोशल मीडियावर किसान विरोधी नरेंद्र मोदी ही हॅशटॅग मोहीम सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हे विधेयक म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधात काळा कायद्दा असल्याचं म्हटलं आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार मोर्चेबांधणी करीत तीन कृषी विधेयक राज्यसभेत मांडली. या विधेयकांवरून विरोधकांनी देशभर वातावरण तापवले. या विधेयकाला विरोध करून नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध सोशल मीडियावर किसान विरोधी नरेंद्र मोदी ही हॅशटॅग मोहीम सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हे विधेयक म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधात काळा कायद्दा असल्याचं म्हटलं आहे. 

याबाबत राहुल गांधी टि्वट केलं आहे. या कृषी विधेयकांबाबत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना काही प्रश्न केले आहेत. राहुल गांधी यांच्या टि्वटला गुजरातमधील काँग्रेसचे युवा नेते हार्दीक पटेल यांनी रिटि्वट करून म्हटलं आहे की असे प्रकार सुरूच राहणार का ?, सत्ताधारी राजकारण करून शेतकऱ्यांना छळत राहणार का ?

राहुल गांधी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे की शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनविण्याची काम मोदी करीत आहेत. या विधेयकाच्या विरोधात आणि बाजूनं अनेक टि्वट केलं जात आहे. सोशल मीडियावर या विधेयकांवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. 

देशभरात कृषी विधयेकांवरुन वातावरण तापले आहे. मोदी सरकारने ही विधेयके संमत करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. ही बहुचर्चित तीन कृषी विधेयके आज राज्यसभेत मांडण्यात आली. विरोधकांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळातच सरकारने आवाजी मतदानाने ही तिन्ही विधेयके मंजूर केली. या विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर शेतकरी मुक्त झाल्याचे म्हटले आहे. याचबरोबर हमीभावाबाबतही त्यांनी मोठा खुलासा केला आहे. 

कृषि उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक 2020, शेतकऱ्यांना मूल्य आश्वासन (सुरक्षा) करार  व कृषि सेवा विधेयक 2020 ही तीन विधेयके लोकसभेत मंजूर झाली होती. आज त्यावर राज्यसभेची मोहोर उमटली. या वेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत गोंधळ केला. सभापतींसमोरील हौद्यात जाऊन सदस्यांनी विधेयकाविरोधात घोषणा दिल्या. अखेर या गोंधळातच आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर करुन घेण्यात सरकारला यश आले. राज्यसभेचे कामकाज उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.  

कृषी विधेयकांना विरोध करीत विरोधकांनी उपसभापतींसमोरील हौद्यात आणि सभागृहात ठाण मांडले होते. कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विधेयकांवर उत्तर देण्यास सुरूवात केल्यानंतर गोंधळ आणखी वाढला. कृषी मंत्र्यांचे उत्तर गोंधळामुळे सदस्यांना ऐकायला जात नव्हते. अखेर काही मिनिटांतच त्यांनी उत्तर संपल्याचे जाहीर केले. 

यामुळे विरोधी सदस्यांनी उपसभापती हरिवंशसिंह यांचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. याचवेळी काही सदस्यांनी उपसभापतींना हौद्यातून रूलबुकही दाखविले. विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेचे कामकाज एक दिवसासाठी तहकूब करावे, अशी मागणी केली. मात्र, उपसभापतींनी कृषी विधेयकांवर आवाजी मतदान घेतले. या वेळी विरोधकांची घोषणाबाजीही वाढली. अखेर या गोंधळातच आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर करण्यात आली. या वेळी विरोधी पक्षांतील अनेक सदस्य आणि भाजपचे सदस्यांमध्ये जुंपल्याचे चित्रही आज पाहायला मिळाले.  
 
विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर मोदी यांनी म्हटले आहे की, दशकानुदशके भारतीय शेतकरी अनेक बंधने आणि मध्यस्थांच्या कचाट्यात अडकला होता. संसदेने ही विधेयके मंजूर करुन शेतकऱ्यांना अशा बंधनातून मुक्त केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ही विधेयके महत्वाची ठरतील. 

याचबरोबर हमी भावाबाबत मोदी म्हणाले की, मी आधीही सांगितले होते आणि आता पुन्हा सांगतो की हमी भाव कायम राहील. याचबरोबर  सरकारी खरेदी कायम राहील. आम्ही येथे आमच्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. अन्नदात्याला सर्वप्रकारे मदत करण्याच्या आमचा प्रयत्न आहे. त्यांच्या पुढील पिढीचे जीवन आम्हाला चांगले बनवायचे आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख