राहुल गांधी आसाममध्ये केवळ सहलीला येतात... - For Rahul Gandhi, visiting Assam is nothing more than picnic: Amit Shah | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल गांधी आसाममध्ये केवळ सहलीला येतात...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 23 मार्च 2021

राहुल गांधी आसाममध्ये निसर्गाचा आनंद लुटायला येतात व परत जातात. बाकी त्यांना आसामबद्दल, येथील लोकांबद्दल काहीही घेणे-देणे नाही. आसाममधील चहा कामगारांकरिता अमुक केले, तमुक केले अशा बढाया राहुल गांधी यांनी नुकत्याच मारल्या. प्रत्यक्षात मात्र आसाममध्ये काँग्रेस सरकारने काहीही विधायक काम केलेले नाही, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. 

आसाम: आसाममधील विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच पेटू लागले असून राजकारण्यांकडून आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच असल्याचे दिसते. आसाममधील विधानसभा निवडणुका २७ मार्चपासून तीन टप्प्यात होत असून मतमोजणी २ मे रोजी होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर बोचरी टीका करत राहुल गांधी केवळ मौज-मजा, पर्यटनाकरिता आसाम राज्यात येतात, असे ते म्हणाले. राहुल गांधी आसाम दौऱ्यावर असून, याच पार्श्वभूमीवर शहा यांनी हे विधान केले. 

विधानसभेच्या प्रचाराकरिता अमित शहा आसाममधील उदैगिरी येथे आले आहेत. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना शहा म्हणाले, राहुल गांधी आसाममध्ये निसर्गाचा आनंद लुटायला येतात व परत जातात. बाकी त्यांना आसामबद्दल, येथील लोकांबद्दल काहीही घेणे-देणे नाही. काँग्रेसने आसाममधील चहा कामगारांकरिता काहीही केले नाही. आसाममधील चहा कामगारांकरिता अमुक केले, तमुक केले अशा बढाया राहुल गांधी यांनी नुकत्याच मारल्या. प्रत्यक्षात मात्र आसाममध्ये काँग्रेस सरकारने काहीही विधायक काम केलेले नाही. 

आसाममध्ये भाजपने केलेल्या कामांबाबत बोलताना अमित शहा म्हणाले, भाजपने पाच वर्षात काम करणाऱ्या गर्भवती महिलांना प्रत्येकी साडेबारा हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. प्रत्यक्षात मात्र १८ हजार रुपये देऊ केले. तसेच साडेसात लाखांपेक्षा अधिक बँक खाती उघडल्याचा दावाही शहा यांनी केला. काँग्रेसची आसाममध्ये तब्बल १५ वर्षे सत्ता होती. या कालावधीत अतिरेकी हल्ले झाले तसेच अनेक निष्पाप नागरिक मारले गेले. अनेक जवानही शहीद झाले. या अतिरेकी हल्ल्यांचा तपास अद्यापही लागलेला नाही. बंदुकीच्या गोळ्या, बंदुका व नागरिक गतप्राण होणे, हा आसाममधील भूतकाळ असून भाजप सत्तेवर आल्यानंतर या सर्व गोष्टी पूर्णपणे थांबल्या आहेत, असेही शहा यांनी सांगितले.   

दरम्यान, आसाममधील जोरहत येथील रॅलीला संबोधताना राहुल गांधी शनिवारी म्हणाले होते की, एलपीजी गॅस सिलिंडर काँग्रेसच्या काळात ४०० रुपयांवर होता. भाजपच्या काळात मात्र त्याची किंमत ९०० रुपये झाली असून याचा कुणाला फायदा होतो? भारतातील केवळ २-३ उद्योजकांचे कर, कर्ज माफ केले गेले.      

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख