राहुल गांधी... या महान संधीबद्दल तुमचे आभार - Rahul Gandhi ... Thank you for this great opportunity | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल गांधी... या महान संधीबद्दल तुमचे आभार

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 30 जानेवारी 2021

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या आपल्या वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधत आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या आपल्या वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधत आहेत. आता राहुल गांधी एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत.

व्हिलेज कुकिंग या यूट्यूब चॅनेलवर त्यांचा एक व्हीडिओ प्रदर्शित झाला आहे. व्हिलेज कुकिंग पाककृती यूट्यूब चॅनेलला भेट देऊन त्यांच्या एका उपक्रमात ते सहभागी झाले आहेत. राहुल गांधी गेल्यामुळे व्हिलेज कुकिंगच्या सदस्यांनाही आनंद झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. राहुल गांधींनी मशरुम बिर्याणीसोबत तोंडी लावायला कोशिंबीर तयार करण्यासाठी मदत केली आहे. दही, कांदा, मीठ कालवून त्यांनी कोशिंबीर तयार केली.

मशरूम बिर्याणी तयार झाल्यानंतर व्हिलेज कुकिंग टीमच्या सदस्यांबरोबर पंगतीला बसून गरमागरम जेवणाचा आस्वाद घेतला. खेड्यातील या लोकांना पाठबळ दिल्याबद्दल धन्यवाद अशा प्रतिक्रिया टीम व्हिलेज कुकिंगने दिली आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा भेटण्याचं आश्वासन देऊन टिम व्हिलेज कुकिंगच्या टीमचा निरोप घेतला.

 

राहुल गांधींचा हा व्हिडिओ पोस्ट करत 'व्हिलेज कुकिंग' टीमने असे लिहिले आहे की, "आजचा दिवस आमच्यासाठी मोठा दिवस आहे. राहुल गांधी आमच्या स्वयंपाकाच्या कामात सामील झाले व त्यांनी खूप प्रोत्साहन दिले. आज आम्ही पारंपारिक आणि आयुर्वेदीक पदार्थांचा वापर करून मशरूम बिर्याणी बनवली. राहुल गांधी यांनी आमच्याबरोबर मशरूम बिर्याणीचा आस्वाद घेतला. आमच्या आयुष्यातील हा मोठा क्षण आहे. हा दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही. राहुल गांधी या महान संधीबद्दल तुमचे आभार' असे म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख