पंतप्रधान मोदींवर टीकेचे 'पोस्टर' अन् राहुल गांधींचे अटक करण्याचे 'चॅलेंज' - Rahul Gandhi has challenged the Delhi Police to arrest him | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधान मोदींवर टीकेचे 'पोस्टर' अन् राहुल गांधींचे अटक करण्याचे 'चॅलेंज'

वृत्तसंस्था
रविवार, 16 मे 2021

देशभरात लशीचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे.​

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लसीकरणाच्या धोरणावर टीका करणारे पोस्टर लावल्याप्रकरणी दिल्लीत पोलिसांनी २५ जणांना अटक केली आहे. 'मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली?' असे पोस्टर अनेक भागांत लावण्यात आले आहेत. त्यावरून आता काँग्रेसने मोदींविरोधात जोरदार मोहिम उघडली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हे पोस्टर ट्विट करून 'मलाही अटक करा' असे खुले आव्हान दिले आहे. हे पोस्टर आता सोशल मीडियात व्हायरल होऊ लागले आहे. (Rahul Gandhi has challenged the Delhi Police to arrest him)

देशातील कोरोनाचा संसर्ग काहीप्रमाणात कमी होत असला तरी अद्याप स्थिती आटोक्यात आलेली नाही. संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लसीकरण कार्यक्रम राबवला आहे. सध्या १८ वर्षांपुढील सर्वांना लस दिली जात आहे. पण देशभरात लशीचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबवले आहे. तसेच अनेक भागात ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जात आहे. यावरून नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. 

हेही वाचा : चक्रीवादळाची तीव्रता वाढली! गोव्यासह कर्नाटकला झोडपलं, महाराष्ट्रालाही बसणार तडाखा

देशात लसीकरण सुरू झाल्यानंतर भारतातील अनेक देशांमध्ये लशीचे कोट्यवधी डोस पाठवण्यात आले. त्यावरून काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. नागरिकांकडूनही मोदी सरकारच्या या धोरणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत दिल्लीमध्ये काही जणांनी 'मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली?' असं लिहिलेली पोस्टर चिटकवण्यात आली होती. त्यावरून पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. 

या अटकसत्रानंतर काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी हेच पोस्टर ट्विट करून 'मलाही अटक करा' असे आव्हान दिले आहे. तसेच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाद्रा यांनीही हे पोस्टर ट्विट केले असून आपले प्रोफाईल पिक हटवून त्याजागी हे पोस्टर ठेवले आहे. त्यानंतर राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते, कार्यकर्ते व नेटकऱ्यांनीही प्रियांका गांधी यांचे अनुकरण केले आहे. 

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सात वाजेपर्यंत देशात १८ कोटी २२ लाखांहून अधिक लशीचे डोस देण्यात आले आहेत. तर तिसऱ्या टप्प्यातील १८ ते ४४ वयोगटातील ४८ लाख जणांना लस देण्यात आली आहे. राज्यांना आतापर्यंत २० कोटी डोस वितरित करण्यात आले असून आज १ कोटी ८४ लाख डोस विविध राज्यांकडे शिल्लक आहेत. पुढील तीन दिवसांत ५१ लाख अतिरिक्त डोस वितरित केले जाणार असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख