पंजाबचं राजकारण राहुल गांधीच फिरवणार... टीमला केलं सक्रिय!

पंजाबमध्ये राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे अजय माकन यांची निरीक्षक म्हणून पाठवणी करण्यात आली.
Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली : पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग (Captain Amrinder Singh) यांच्या राजीनाम्यानंतर काॅंग्रेसच्या (congres) प्रथेप्रमाणे पक्ष आमदारांनी विधीमंडळ पक्ष नेता निवडीचे सर्वाधिकार सोनिया गांधींना (Sonia Gandhi) सोपविले असले तरी मुख्यमंत्री निवडीत राहुल गांधींचा शब्द अंतिम राहणार आहे. मुख्यमंत्रीपदासाठी खासदार रवनितसिंग बिट्टू, कॅप्टन सरकारमधील मंत्री राहिलेले सुखजिंदरसिंग रंधावा आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड ही नावे चर्चेत आली आहेत.

पंजाबची विधानसभा निवडणूक कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याच नेतृत्वाखाली होईल, असे काॅंग्रेसतर्फे याआधी वारंवार सांगण्यात आले होते. असे असताना त्यांच्या गच्छंतीच्या निर्णयानंतर पंजाब काॅंग्रेस एकसंघ राहण्याबाबत साशंकता वाढली आहे. असे असताना कॅप्टन अमरिंदरसिंह यांच्या सारख्या प्रभावी नेत्याला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडून राहुल गांधींनी पक्षातील संघटनात्मक निर्णय प्रक्रियेवर आपली पकड मजबूत असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे.

तापर्यंत अशा राजकीय वादांवर तोडगा काढण्यासाठी काॅंग्रेस नेतृत्वाकडून वरिष्ठ नेत्यांची नेमणूक केली जात होती. मात्र, आता ही जबाबदारी टीम राहुलने हाताळणे सुरू केले आहे. पंजाबमध्ये राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे अजय माकन यांची निरीक्षक म्हणून पाठवणी करण्यात आली. याआधी माकन यांना राजस्थान सरकारमध्ये गेहलोत – पायलट वाद उफाळल्यानंतर आमदारांशी चर्चेसाठी पाठविण्यात आले होते. पाठोपाठ राजस्थानच्या प्रभारी सरचिटणीस पदाचीही जबाबदारी माकन यांना देण्यात आली होती. आता पंजाबमध्ये माकन यांच्यासोबतचे दुसरे निरीक्षक असलेले राजस्थानमधील मंत्री हरिश चौधरी हे देखील राहुल टीमचे सदस्य म्हणून ओळखले जातात. याआधी ते पंजाबचे सहप्रभारी होते. शिवाय, पक्षश्रेष्ठींचा कॅप्टन अमरिंदरसिंग यांना हटविण्याचा मानस असल्याचा आमदारांपर्यंत संदेश पोहोचविण्याचा आरोपही हरिश चौधरी यांच्या सहप्रभारीपदाच्या काळात झाला होता. त्यामुळे संभाव्य नेतृ्वाबद्दल आमदारांचा कल जाणून घेण्यासाठी या नेत्यांच्या पाठवणीतून राहुल गांधींनी सूचक संदेश दिल्याचे मानले जात आहे.

वाचा ही बातमी : सोनिया गांधी म्हणाल्या, आय अॅम साॅरी कॅप्टन!

दरम्यान, पंजाबमधील घडामोडींमध्ये राहुल गांधींची सक्रीयता पाहता या घटनाक्रमाचे पडसाद काॅंग्रेसशासीत छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नजिकच्या काळात होणाऱ्या काॅंग्रेसच्या संघटनात्मक बदलांमध्ये देखील पंजाबप्रमाणे धाडसी निर्णय घेतला जाऊ शकतो. जुन्या नेत्यांवर अवलंबून राहण्याऐवजी बाहेरच्या पक्षांमधून काॅंग्रेसमध्ये आलेल्या आक्रमक चेहऱ्यांचा विचार केला जाऊ शकतो, असे कळते.

मुख्यमंत्री पदावरून हटविताना आपला अपमान झाल्याचे सांगणारे कॅप्टन अमरिंदरसिंग गप्प बसणार नाहीत, काॅंग्रेसला त्यामुळे सोसावे लागू शकते याचा अंदाज असल्याने आहे. ही हानी टाळण्यासाठी मुख्यमंत्री पदासाठी संभाव्य नावांवर गांभीर्याने विचारविनिमय सुरू झाला आहे.


पारंपरिक शीख मतदारांना आकर्षित करण्यासाठी दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले दिवंगत मुख्यमंत्री बेअंतसिंग यांचे नातू आणि विद्यमान खासदार रवनितसिंग बिट्टू यांना पुढे केले जावे, असा मतप्रवाह काॅंग्रेसमध्ये आहे. तर प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांची महत्त्वाकांक्षा पाहता या पदावरून संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी मर्यादीत काळासाठी (निवडणुकीपर्यंतचे सहा महिने) मुख्यमंत्रीपद बिगर शीख व्यक्तिकडे सोपवावे असाही युक्तिवाद काॅंग्रेसमध्ये आहे. काॅंग्रेसचे दिवंगत बडे नेते बलराम जाखड यांचे पुत्र आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष राहिलेले सुनील जाखड यांच्या रुपाने पहिला हिंदू मुख्यमंत्री बनविल्यास शीख आणि हिंदू अशा दोन्ही मतपेढ्यांची मोट बांधता येईल. तसेच कॅप्टन इफेक्ट कमी करता येईल, असाही युक्तिवाद पक्षातून पुढे येत आहे. याशिवाय, कॅप्टन यांच्या मंत्रिमंडळात सहकार मंत्री राहिलेले सुखजिंदरसिंग रंधावा यांच्याही नावाची मुख्यमंत्रीपदाची चर्चा आहे.

सिद्धूंविरोधात पाकिस्तानी कार्ड

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी नवज्योतसिंग सिद्धू यांचा पत्ता कापण्यासाठी कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी "पाकिस्तानची मदत" घेतली आहे. तसेच नवा मुख्यमंत्री कोण हे पाहूनच कॅप्टन आपली पुढील वाटचाल ठरविणार असल्याचे कळते. सिद्धू हे अकार्यक्षम मंत्री होते. सात सात महिने आपल्या फायली निकाली काढत नव्हते म्हणून त्यांची हाकलपट्टी करावी लागली होती, असा दाखला देत कॅप्टन अमरिंदरसिंग हे सिद्धू यांच्या अकार्यक्षमवर बोट ठेवत आहेत. तर भाजपच्या अतिशय जिव्हाळ्याचा आणि केंद्रस्थानी असलेला राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे केला आहे. माजी क्रिकेटपटू सिद्धू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान त्याचप्रमाणे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांची घेतलेली गळाभेट याचेही दाखले देण्यात हयगय करायची नाही, अशी रणनिती कॅप्टन यांनी आखल्याचे दिसते.शिवाय, सिद्धू यांना मुख्यमंत्री केल्यास याच पाकिस्तानी संबंधांचा वापर भाजपकडून प्रचारासाठी होऊ शकतो. त्यामुळे हे पाकिस्तान कार्ड खेळून कॅप्टन यांनी सिद्धू यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या मार्गात काटे पेरल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com