काँग्रेसचं सरकार २२ तारखेला कोसळणार! भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा... - Puducherry LG orders floor test in the legislative assembly on 22nd February | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसचं सरकार २२ तारखेला कोसळणार! भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा...

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच काँग्रेसला धक्का बसला आहे

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच काँग्रेसला धक्का बसला आहे. चार आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसचे पुदुच्चेरीमधील सरकार अल्पमतात आले आहे. काँग्रेसला २२ फेब्रुवारीला बहुमत सिध्द करण्याचे आदेश नायब राज्यपालांनी दिले आहेत. हे सरकार बहुमताअभावी कोसळणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.

पुदुच्चेरी मधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तमिळनाडू व पुदुच्चरी राज्यांची निवडणूक काही महिन्यांतच होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडूमध्ये काँग्रेस व डीएमके यांनी आघाडी केली आहे. या दोन पक्षांचीच पुदुच्चरीमध्ये सत्ता आहे. एकूण ३० विधानसभा सदस्य असलेल्या पुदुच्चरीमध्ये काँग्रेसचे १५ आमदार आहेत. तर डीएमकेच्या दोन आमदारांच्या समर्थनानंतर बहुमताचा आकडा पार केला होता. 

काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांचे सरकार अल्पमतात आले आहे. काँग्रेसकडे आता ११ आमदार उरले आहेत. आमदार ए. नमासिव्यम आणि ई थीपप्पंजन यांनी २५ जानेवारीलाच राजीनामा दिला आहे. तर एका आमदाराने सोमवारी आणि एका आमदाराने मंगळवारी राजीनामा दिला. दरम्यान, राजीनामा दिलेले आमदार कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार असल्याने चार आमदारांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेसचे सरकार अल्पमतात आल्यानंतर भाजप व इतर विरोधी पक्षांनी नायब राज्यपालांची भेट घेतली. काँग्रेसचे सरकार अल्पमतात असल्याने त्यांनी बहुमत सिध्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यानुसार नायब राज्यपालांनी २२ तारखेला बहुमत सिध्द करण्यास सांगितले आहे. 

याविषयी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही समीनाथन म्हणाले, मुख्यमंत्री व्ही नारायणसामी बहुमत सिध्द करू शकणार नाही. त्यांचा बहुमताचा दावा चुकीचा आहे. त्यांचे सरकार २२ फेब्रुवारीला कोसळेल. आमचे सर्व १४ आमदार एकत्रित आहेत. उपराज्यपालांना भेटून आम्ही बहुमत सिध्द करण्याची मागणी केली आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख