काँग्रेस सरकार संकटात... विश्वासदर्शक ठरावाआधीच आणखी एक आमदार फुटला - Puducherry Congress Government in crisis as another mla quits before floor test | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

काँग्रेस सरकार संकटात... विश्वासदर्शक ठरावाआधीच आणखी एक आमदार फुटला

वृत्तसंस्था
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

विश्वासदर्शक ठरावाच्या एक दिवस आधी आणखी एका आमदाराने राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे.

पुदुच्चेरी : पुदुच्चेरीतील काँग्रेस सरकारवरील संकट आणखी गडद झाले आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या एक दिवस आधी आणखी एका आमदाराने राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे विधानसभेत २२ फेब्रुवारीला बहुमत सिध्द करणे काँग्रेस सरकारसाठी आव्हानात्मक बनले आहे. 

पुदुच्चेरी मधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तमिळनाडू व पुदुच्चरी राज्यांची निवडणूक काही महिन्यांतच होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडूमध्ये काँग्रेस व डीएमके यांनी आघाडी केली आहे. या दोन पक्षांचीच पुदुच्चरीमध्ये सत्ता आहे. एकूण ३० विधानसभा सदस्य असलेल्या पुदुच्चरीमध्ये काँग्रेसचे १५ आमदार होते. डीएमकेच्या दोन आमदारांच्या समर्थनानंतर बहुमताचा आकडा पार केला होता. 

पण विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच काँग्रेसला धक्का बसला आहे. चार आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसचे पुदुच्चेरीमधील सरकार अल्पमतात आले. काँग्रेसला २२ फेब्रुवारीला बहुमत सिध्द करण्याचे आदेश नायब राज्यपालांनी दिले आहेत. मुख्यमंत्री नारायमसामी यांच्याकडून सरकारकडे बहुमत असल्याचा दावा केला जात आहे. पण एक दिवस आधीचे काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने साथ सोडली आहे. 

हेही वाचा : भाजपच्या सभेचा फज्जा, रिकाम्या खुर्च्यांचे छायाचित्र व्हायरल..

आमदार के. लक्ष्मीनारायणन यांनी विधानसभा अध्यक्ष वीपी शिवाकोझुंडु यांच्याकडे आज राजीनामा सोपविला. त्यामुळे काँग्रेसची साथ सोडणाऱ्या आमदारांची संख्या पाच झाली असून आता सरकारकडे केवळ १० आमदारांचे संख्याबळ उरले आहे. त्यामुळे सोमवारी विश्वासदर्शक ठराव जिंकणे काँग्रेससाठी अशक्य ठरणार आहे. 

दरम्यान, सरकार व पक्षामध्येही आपल्याला योग्य स्थान न मिळाल्याने राजीनामा दिल्याचे लक्ष्मीनारायणन यांनी सांगितले. माझ्या मतदारसंघातील लोकांशी चर्चा केल्यानंतर अन्य पक्षांमध्ये जाण्याचा निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख