काँग्रेसची आज अग्निपरीक्षा : बहुमत सिध्द करण्याचे आव्हान... - Puducherry Chief Minister Claims Majority today In Trust Vote Debate | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसची आज अग्निपरीक्षा : बहुमत सिध्द करण्याचे आव्हान...

वृत्तसंस्था
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

बहुमतासाठी १४ आमदारांचे संख्याबळ दाखवावे लागणार असून सध्यातरी काँग्रेसकडे १२ आमदार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले

पुदुच्चेरी : पुदुच्चेरीतील काँग्रेस सरकारची आज अग्निपरीक्षा असून सायंकाळी पाच वाजता बहुमत सिध्द करावे लागणार आहे. बहुमतासाठी १४ आमदारांचे संख्याबळ दाखवावे लागणार असून सध्यातरी काँग्रेसकडे १२ आमदार असल्याचे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांनी सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेस १४ चा आकडा गाठून सरकार टिकवणार का, याबाबत उत्सुकता आहे.

पुदुच्चेरी मधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तमिळनाडू व पुदुच्चरी राज्यांची निवडणूक काही महिन्यांतच होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडूमध्ये काँग्रेस व डीएमके यांनी आघाडी केली आहे. या दोन पक्षांचीच पुदुच्चरीमध्ये सत्ता आहे. एकूण ३० विधानसभा सदस्य असलेल्या पुदुच्चरीमध्ये काँग्रेसचे १५ आमदार होते. डीएमकेच्या दोन आमदारांच्या समर्थनानंतर बहुमताचा आकडा पार केला होता. 

पण विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच काँग्रेसला धक्का बसला आहे. पाच आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसचे पुदुच्चेरीमधील सरकार अल्पमतात आले. काँग्रेसला आज बहुमत सिध्द करण्याचे आदेश नायब राज्यपालांनी दिले आहेत. मुख्यमंत्री नारायमसामी यांच्याकडून सरकारकडे बहुमत असल्याचा दावा केला जात आहे.

आज विधानभेत विश्वासदर्शक ठरावाला काँग्रेसचे सरकार सामोरे जात आहे. या चर्चेदरम्यान बोलताना मुख्यमंत्री नारायणसामी यांनी सभागृहात सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले, आम्ही डीएमके आणि अपक्षांसोबत मिळून सरकार स्थापन केले. त्यानंतर आम्ही एकत्रितपणे अनेक निवडणुका लढलो. आम्ही या सर्व निवडणुका जिंकलो. त्यामुळे येथील लोकांचा आमच्यावर विश्वास असल्याचे स्पष्ट होते. 

केंद्र सरकारसह आधीच्या नायब राज्यपालांनी अनेक अडथळे आणले. आम्ही विनंती करूनही केंद्र सरकारने निधी दिला नाही. तमिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये आम्ही दोन भाषा प्रणिली आणली. पण भाजपने जबरदस्तीने हिंदी लादण्याचा प्रयत्न केला, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख