श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवण्यावर बंदी.. मग ते जमिनीचे तुकडे घेऊन काय करायचे ?  - The problem of Ram temple in Ayodhya was solved. That is how the Kashmir issue should end | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवण्यावर बंदी.. मग ते जमिनीचे तुकडे घेऊन काय करायचे ? 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

काश्मीरात आता बाहेरच्यांनाही जमीन खरेदी करता येईल असे सरकारी आदेश आले; पण श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यावर आजही बंदी आहे. मग ते जमिनीचे तुकडे घेऊन काय करायचे ? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.  
 

मुंबई : "काश्मिरची समस्या कायमचीच संपायला हवी. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न मार्गी लागला. तसा काश्मीरचा प्रश्नही संपावा," असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील खासदार संजय राऊत यांनी आपल्या 'रोखठोक'मध्ये म्हटलं आहे. 

'सामना'च्या 'रोखठोक'मध्ये आज काश्मिर प्रश्न, काश्मिर प्रश्नावरून केले जाणारे राजकारण, काश्मिरी पंडित, 370 कलम, काश्मिरचा प्रश्न आणि पंडित नेहरू, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे.

"370 कलमाचा निचरा करूनही कश्मीरचा प्रश्न संपला नाही. काश्मीरात आता बाहेरच्यांनाही जमीन खरेदी करता येईल असे सरकारी आदेश आले; पण श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यावर आजही बंदी आहे. मग ते जमिनीचे तुकडे घेऊन काय करायचे ? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.  
 
काश्मीरच्या भूमीवर जितका रक्तपात झाला तेवढा आतापर्यंत हिंदुस्थानने लढलेल्या चार युद्धांतही झाला नसेल. मोदी हे दुसऱ्या वेळेस पंतप्रधान झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात अमित शहा गृहमंत्री म्हणून बसले. त्यांनी एक काम केले. ते म्हणजे कश्मीरातील 370 कलम उडवून लावले. ‘35 अ’ कलम संपवले. लडाखला जम्मू-कश्मीरपासून तोडून स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश केला. या घटनेस एक वर्ष झाल्यावर आता जम्मू-कश्मीरमध्ये बाहेरच्या लोकांना जमीन खरेदीस केंद्राने परवानगी दिली आहे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कश्मीरमध्ये 370 कलम असल्यामुळे ते एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगत होते. 

पुन्हा तेथील राजकीय पक्षांचा दोन दगडांवर पाय. त्यातला एक पाय पाकिस्तानात. हिंदुस्थानच्या केंद्रीय सरकारने मनासारखे केले नाही तर पाकिस्तानप्रेमाचे तुणतुणे वाजवून ‘ब्लॅकमेल’ करायचे हे आतापर्यंत चालले. ते काही प्रमाणात कमी झाले आहे. मात्र 370 कलम हटवल्यावर कश्मीरातील परिस्थिती सुरळीत होईल असे काही झाले नाही. उलट तेथील लोकांवर, राजकीय हालचालींवर कडक निर्बंध लादले. आजही कश्मीरात लष्कराच्या बंदुकांमुळेच शांतता आहे, असे 'रोखठोक'मध्ये नमूद केलं आहे. 

कश्मीर ही हिंदुत्वाची, धर्माची भूमी आहे. देव-देवतांची भूमी आहे. आता तिकडे जमिनी वगैरे खरेदी करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. पण चार दिवसांपूर्वीच श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यास गेलेल्या तरुणांना पोलिसांनी रोखले. तिरंगा फडकवण्यास मज्जाव केला. पुणाच्या भावना दुखावतील म्हणून हा विरोध केला? तिरंगा फडकवल्याने वातावरण बिघडेल म्हणून विरोध केला का? जमिनी खरेदी करायच्या, पण त्या जमिनीवर आमचा तिरंगा फडकवता येत नसेल तर त्या जमिनीच्या तुकडय़ांचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. 

मेहबुबा मुफ्ती व त्यांचा पक्ष सरळ आझाद कश्मीरच्या बाजूने आहे. जोपर्यंत पुन्हा 370 कलम कश्मीरात लावले जात नाही तोपर्यंत कश्मीरात तिरंगा फडकवू दिला जाणार नाही, अशी बेताल भाषा करणाऱया मेहबुबा मुफ्तीला अटक करून दिल्लीतील तिहार किंवा महाराष्ट्रातील येरवडा तुरुंगात ठेवायला हवे. किंबहुना त्यांची रवानगी अंदमानच्या कारागृहात करायला हवी एवढा त्यांचा अपराध भयंकर आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी तर हिंदुस्थानच्या विरोधात चीनची मदत घ्यायची भाषा केली. हा अतिरेक आहे, असे राऊत यांनी म्हटलं आहे. 

  1. कश्मीरचा प्रश्न फक्त पंडित नेहरू किंवा काँग्रेसमुळेच चिघळला हा काही प्रमाणात अपप्रचार आहे. पंडित नेहरूंनी कश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी व शांतता राखण्यासाठी त्यांच्या परीने प्रयोग केले. असे ‘प्रयोग’ अटलबिहारी वाजपेयी यांनीही केले. लाहोरला ते बस घेऊन गेले. मुशर्रफबरोबर आग्रा येथे परिषद घेतली. हा प्रयोगच होता.
  2. मोदी-शहा यांनी मेहबुबा मुफ्तींबरोबर भाजपचे सरकार जम्मू-कश्मीरमध्ये बनवले. ते कशासाठी? याकडेही एक शांतता राखण्याचा ‘प्रयोग’ म्हणूनच पाहायला हवे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा कश्मीरच्या भूमीवर मृत्यू झाला. हे बलिदान ठरले. त्याचा संदर्भ आजही दिला जातो. 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख