प्रशांत किशोर राहुल गांधींना भेटले..भाजपविरोधी मोर्चेबांधणी? - prashant kishor meets rahul gandhi and priyanka gandhi punjab congress | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

प्रशांत किशोर राहुल गांधींना भेटले..भाजपविरोधी मोर्चेबांधणी?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जुलै 2021

प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी ,प्रियांका गांधींची भेट घेतली.या भेटीमागच्या कारणांबाबत वेगवेगळे कयासही लढविले जात आहेत.

नवी दिल्ली : पंजाबच्या निव़डणुकीची रणधुमाळी आणि उत्तर प्रदेशात निवडणुकीचे वाजलेले पडघम या पार्श्वभूमीवर राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधींची दिल्लीत घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. या भेटीमागच्या कारणांबाबत वेगवेगळे कयासही लढविले जात आहेत.prashant kishor meets rahul gandhi and priyanka gandhi punjab congress

पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसमध्ये अंतर्कलह सुरू असताना प्रशांत किशोर यांची राहुल गांधींशी भेट महत्वाची मानली जात आहे. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना सत्ताधारी काँग्रेस पक्ष गृहकलहाने बेजार झाला आहे. तर उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गुजरात, गोवा, मणिपूर या राज्यांच्या निवडणुकाही तोंडावर आहेत. मात्र, या राज्यांमध्येही काँग्रेसची अवस्था फारशी समाधानकारक नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तिसऱ्यांदा सत्ता वापसीत मोलाचा वाटा असलेले रणनितीकार प्रशांत किशोर यांची गेल्या काही महिन्यात वाढलेली राजकीय सक्रीयता आणि शरद पवारांपासून ते इतर नेत्यांच्या त्यांनी घेतलेल्या भेटीगाठी पाहता आज राहुल गांधींशी झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.

या भेटीतील चर्चेचा तपशील कळू शकलेला नसला तरी प्रामुख्याने पंजाबचा विषय केंद्रस्थानी असल्याचे तसेच प्रियांका गांधींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत उत्तर प्रदेशमधील स्थितीबद्दलही चर्चा झाल्याचे बोलले जाते.

प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर राजकीय रणनितीकार म्हणून काम करणार नसल्याचे याआधीच जाहीर केले आहे. परंतु त्यांची आयपॅक ही सल्लागार कंपनी पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासाठी काम करत आहे. शिवाय, सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी असलेल्या प्रियांका गांधींनी आजचा (ता. १४) लखनऊ दौरा टाळून शुक्रवारी (ता. १६) लखनऊला कार्यकर्ता मेळाव्यासाठी जाण्याचा घेतलेला निर्णय पाहता उत्तर प्रदेशातील स्थितीबद्दलही चर्चा झाली असावी, असा कयास आहे.
Edited by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख