#बिहार निवडणूक ; चिराग पासवान यांचे 'हे' आहेत रणनीतीकार   - Prashant Kishor big behind-the-scenes role in Paswan campaign strategy | Politics Marathi News - Sarkarnama

#बिहार निवडणूक ; चिराग पासवान यांचे 'हे' आहेत रणनीतीकार  

वृत्तसंस्था
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

प्रशांत किशोर लोजपा व अन्य छोट्या पक्षांशी संधान बांधून स्वतःचे राजकीय भवितव्यही पुन्हा चाचपडून पहात असल्याची दिल्लीत चर्चा आहे.

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्यावर सडकून टीका करणारे लोकजनशक्ती पक्षाचे नवे नेते खासदार चिराग पासवान यांची प्रचार रणनीती आखण्यात प्रशांत किशोर यांची पडद्यामागून मोठी भूमिका असल्याची माहिती मिळते. 

निकालापूर्वी पासवान यांना उघड पाठिंबा देणे परवडणारे नसल्याने किशोर यांच्या मार्फत चिराग यांची प्रचार मोहीम आखून देण्याची चाल खेळण्यात आल्याची चर्चा आहे. प्रशांत किशोर निवडणूक रणनीतीकार म्हणून मोठी प्रसिध्दी गुजरात व नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाली. प्रशांत किशोर हेही मूळचे बिहारी आहेत.

बिहारमध्ये ते जाहीरपणे कोठेही रिंगणात नाहीत. "मोदी तुझसे बैर नही, नितीश तेरी खैर नही' या भूमिकेतून उतरलेल्या चिराग यांना कौशल्याने पुढे करून भाजपने नितीशकुमार यांच्या जदयूची स्थिती "सहन होत नाही व सांगताही येत नाही', अशी करून ठेवली आहे. 

चिराग यांनी तब्बल 12 ते 13 भाजप बंडखोरांना रातोरात तिकीटवाटप केले. म्हणूनच 10 नोव्हेंबरला निकाल लागल्यावर चिराग यांना "हातचा' म्हणून भाजप नेतृत्वाने कुशलतेने बाजूला ठेवले आहे. राजेंद्र सिंह, रामेश्वर चौरसिया, उषा विद्यार्थी, इंदु कश्‍यप, मृणाल शेखर आदी दिग्गज भाजप नेत्यांनी रातोरात चिराग यांच्या पक्षाचे तिकीट स्वीकारणे हे रामविलास पासवान यांच्या संपूर्ण अनुपस्थितीत एकट्या चिराग यांच्या क्षमतेचे काम नाही, याची चर्चा दिल्लीतही आहे.

सूत्रांनी सांगितले की नितीशकुमार यांनी माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या हिन्दुस्तानी आवाम मोर्चाला (हम) एनडीएमध्ये स्थान दिल्याने चिराग यांचा पहिल्यांदा भडका उडाला. त्यानंतर त्यांच्याकडे तातडीने प्रशांत किशोर यांच्या टीमने रसद पुरवण्याची तयारी दाखविली व त्यांच्याच सांगण्यानुसार चिराग यांनी 143 जागांवर लोजपा उमेदवार उभे करण्याचा निर्णय केला. प्रशांत किशोर यांची चिराग पासवान यांना पडद्याआडून मदत सुरू असल्याचा संशय जदयूमध्येही आहे.

चिराग यांना मदत करता करता प्रशांत किशोर लोजपा व अन्य छोट्या पक्षांशी संधान बांधून स्वतःचे राजकीय भवितव्यही पुन्हा चाचपडून पहात असल्याची दिल्लीत चर्चा आहे. त्यांनी सोशल मिडीयावरील आपली ताकद, बुध्दिमत्ता व संपर्कसूत्रांचे महाजाल चिराग यांच्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. त्याचबरोबर निकालानंतर भाजपाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तर चिराग यांना कॉंग्रेस वा तेजस्वी यादव यापैकी कोणाकडेही जाता यावे याचीही सोय त्यांनी करून दिली आहे.

'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट' 
चिराग यांचा आतापावेतो प्रचार पाहिला तर त्यावर प्रशांत किशोर यांची छाप स्पष्ट दिसते. पीके यांनी आपला पक्ष बनवतेवेळी "टीके 10' मिशन ही निवडणूक प्रचारमोहीम आखली होती. त्यांचा पक्ष बाळसे धरू शकला नाही तरी आता तीच टीके10 संकल्पना चिराग यांनी 'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट' या नावाने जशीच्या तशी उचलल्याचे दिसते. बिहारला देशातील नंबर वन राज्य बनविण्याची स्वप्ने दाखविण्याची ही योजना आहे. कोरोना काळात बिहारच्या निवडणुकीवर डिजीटल माध्यमांचा मोठा प्रभाव आहे. तेजस्वी यादव सोडले तर राज्यातील एकाही नेत्याच्या सभेला म्हणावी अशी गर्दी होत नाही. त्यामुळे प्रचाराचा मुख्य भर डिजीटलवरच आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख