प्रकाश आंबेडकर म्हणाले,  "देशात नवीन राजकीय समीकरण घडविणार..."  - Prakash Ambedkar We will create a new political equation in the country  | Politics Marathi News - Sarkarnama

प्रकाश आंबेडकर म्हणाले,  "देशात नवीन राजकीय समीकरण घडविणार..." 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

बिहारमध्ये निवडणूक लढविण्याचा एकमेव उद्देश हा आहे की एनडीएच्या सरकारला सत्तेत येऊ न देणे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

पुणे : देशात नवीन राजकीय समीकरण आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याची सुरुवात वंचित बहुजन आघाडीने ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षाबरोबर केली होती. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भविष्यात असा प्रयत्न परत करू. जे महाराष्ट्रात घडले नाही ते बिहारमध्ये घडवून आणू. बिहारमध्ये निवडणूक लढविण्याचा एकमेव उद्देश हा आहे की एनडीएच्या सरकारला सत्तेत येऊ न देणे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

बिहारमध्ये मुस्लिम, मागासवर्गीय व आदिवासी मिळून ४० टक्के समाज आहे. त्यामुळे या सर्वांनी एकत्र आल्यावर कोणत्याही सरकारला पाडण्याची ताकद यांच्यामध्ये आहे. शिवाय हे सरकार नागरिकता, आरक्षण यांच्या विरोधात आहे. त्यामुळे मौलवी, मौलाना तसेच सुशिक्षित मुस्लिम बांधवांना माझे सांगणे आहे कि याबाबत विचार करा, आपण सर्वांनी एकत्र येऊन या सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीत पाडू, असेही ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

देशात कोरोनाच्या कहर वाढत असताना बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बिहारमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीची घोषणा होताच आरोप-प्रत्यारोपांनीही जोर चढला आहे. राष्ट्रीज जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी आता एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. यामुळे बिहारमध्ये 'जंगल राज' विरुद्ध 'राक्षस राज' हा वाद पेटला आहे. 

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे बिहारमधील विधानसभा निवडणूक राजकीय पक्षांच्या व्हर्च्युअल प्रचारामुळे गाजणार आहे. बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या घोषणेसोबतच बिहारमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. एकूण तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  

यंदाच्या निवडणुकीत बिहारमध्ये वेगळे राजकीय चित्र पाहायला मिळणार आहे. मागील निवडणुकीवेळी सहकारी असलेले पक्ष आता विरोधात मैदानात आहेत. मागील वेळी लालूप्रसाद यादव यांचा आरजेडी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र होते. त्यावेळी भाजपने लोकजनशक्ती पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्षासोबत आघाडी केली होती. मागील निवडणुकीच नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा विजय झाला होता. या विजयानंतर काही महिन्यांमध्येच नितीश यांनी लालूंच्या पक्षाची साथ सोडत भाजपसोबत आघाडी केली होती. यामुळे विरोधी बाकांवरील भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष सत्तेत आला होता. 
Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख