#बिहार निवडणूक ;  प्रकाश आंबेडकर 'प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडी'सोबत रिंगणात  - Prakash Ambedkar lead with Progressive Democrats in Bihar elections | Politics Marathi News - Sarkarnama

#बिहार निवडणूक ;  प्रकाश आंबेडकर 'प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडी'सोबत रिंगणात 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

प्रकाश आंबेडकर यांनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडीसोबत शड्डू ठोकला आहे. 

मुंबई :  एमआयएमचे असुद्दीन ओवेसी यांच्यासोबत राज्यातआघाडी करत राजकीय आखाड्यात उतरलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडीसोबत शड्डू ठोकला आहे. 

बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. यात प्रकाश आंबेडकर यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पण ते स्वबऴावर लढणार नाही, तर  प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडीसोबत लढणार आहे. याबाबत आंबेडकर यांनी टि्वट केलं आहे. 

आंबेडकर यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे की ‘बिहारमधील वंचित समाज घटकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडीसोबत निवडणूक लढवत आहे. आपणाला विनंती आहे की या कार्यात सहकार्य करा' 

शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणूक लढविण्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. शिवसेना बिहारमध्ये 50 जागा लढवणार आहे. मात्र, शिवसेनेला बिहार विधानसभा निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर लढवता येणार नाही. कारण निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाणाऐवजी बिस्किट हे चिन्ह दिले आहे. 

शिवसेना नेते अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणूक चिन्ह देण्याची मागणी केली होती. देसाई यांनी यात तीन पर्याय दिले होते. बिहारमध्ये सत्ताधारी जेडीयूचे निवडणूक चिन्ह बाण आहे. याचबरोबर झारखंड मुक्ती मोर्चाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आहे.  शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा आणि जेडीयूच्या निवडणूक चिन्हांमध्ये खूप साम्य आहे. यामुळे याला जेडीयूने मागील लोकसभा निवडणुकीवेळी आक्षेप घेतला होता. त्यावेळी शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चाची चिन्हे निवडणूक आयोगाने जप्त केली होती. 
 
बिहारचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्राची व मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या पांडेंविरोधात उमेदवार देण्याची तयारी शिवसेनेने केली होती. मात्र, पांडे यांना तिकीट मिळालेले नसून, त्यांनीही विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार सोडून दिला आहे. 

बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. एकूण तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाच्या आघाडीविरोधात राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस यांची आघाडी असे चित्र दिसत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख