बेंगलुरू : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षांचा तुरूंगवास भोगलेल्या व्ही. के. शशिकला यांना रविवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तुरूंगात असतानाच त्यांना ताप आणि श्वास घ्यायला त्रास होत असल्याने रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. रुग्णालयातून त्या चेन्नईकडे रवाना झाल्याचे नातेवाईकांना सांगितले. त्यामुळे तामिळनाडूतील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शशिकला या तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. मात्र तुरूंगातच कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना तिथून थेट बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शशिकला यांना आज दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास व्हील चेअरवर रुग्णालयातून बाहेर आणण्यात आले. यावेळी रुग्णालयाबाहेर त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. त्यांनी शशिकला यांना पाहिल्यानंतर जोरदार घोषणाबाजी केली. त्यांना शशिकला यांनीही हात जोडून त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. रुग्णालय परिसरात गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून सुमारे 300 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
शशिकला यांच्या कुटूंबियांनी त्यांना घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांनी त्यांना आणखी काही दिवस विलग राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे रुग्णालयातून त्या चेन्नईला गेल्याचे निकवर्तीयांनी सांगितले.
अण्णाद्रमुक पक्षात उलथापालथ होण्याची चिन्हे
शशिकलांच्या सुटका होण्याच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.
शशिकलांची सुटका झाल्यानंतर अण्णाद्रमुक पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शशिकलांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या लवकर बरे व्हाव्यात, अशी सदिच्छा करणारे ट्विट पनीरसेल्वम यांचे पुत्र व्ही.पी.जयप्रदीप यांनी केले आहे. यावरुन पक्षात मोठा गदारोळ सुरू झाला आहे. हे ट्विट माणुसकीच्या भावनेतून केल्याचा प्रतिवाद करण्यात येत आहे. यानंतर पक्षाच्या सर्व नेत्यांना शशिकलाबद्दल बोलण्यास बंदी घातलण्यात आली आहे.
Edited By Rajanand More

