पंतप्रधानांना कटोरा घेऊन पुन्हा अमेरिका, चीनच्या दारात जावे लागत आहे...शिवसेनेचा टोला - politics shivsena comment on wheat crisis in pakistan Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधानांना कटोरा घेऊन पुन्हा अमेरिका, चीनच्या दारात जावे लागत आहे...शिवसेनेचा टोला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

गव्हाच्या साठ्याबाबत  'सामना'मधून टीका करण्यात आली आहे. 

मुंबई : जेमतेम तीन आठवडे पुरेल एवढाच गहू पाकिस्तानच्या निवडक गोदामांमध्ये शिल्लक आहे. तीन आठवडय़ांनंतर खायचे काय, असा गंभीर प्रश्न पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारपुढे निर्माण झाला आहे. पाकिस्तानमधील गव्हाच्या साठ्याबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून टीका करण्यात आली आहे.  

पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अग्रलेखातून हल्लाबोल करण्यात आला आहे. "खायला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा" ही म्हण पाकिस्तानाला लागू पडते, असा टोला सामनातून इम्रान खान यांना मारला आहे.

"आधीच पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांना हातात कटोरा घेऊन पुनः पुन्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपासून अमेरिका व चीनच्या दारात जावे लागत आहे. त्यात गव्हाच्या टंचाईचे अभूतपूर्व संकट पाकिस्तानसमोर उभे ठाकले आहे. इम्रान खान यातून मार्ग काढतीलही, पण खिशात आणा नसताना बाजीराव बनण्याचे सोंग पाकिस्तानने का करावे," असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे. 

काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात...

'खायला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा,' अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आपला शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. हिंदुस्थानसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या पाकिस्तानातील घटना, घडामोडींकडे कितीही डोळेझाक करायची म्हटली तरी दाराजवळचा शेजार म्हणून पाकिस्तानातून येणाऱ्या बातम्या आणि तेथील बऱ्यावाईट गोष्टींकडे नजर ठेवावीच लागते. कमालीचे दारिद्रय़, भुकेकंगाल जनता, महागाईचा आगडोंब, कर्जात आकंठ बुडालेला देश आणि जर्जर झालेली अर्थव्यवस्था हे पाकिस्तानचे वास्तवदर्शी रूप आहे. मात्र तरीही ‘आम्ही अण्वस्त्रसज्ज देश आहोत’ असा तोरा हा देश कायम मिरवत असतो. पाकिस्तानचा हा दिमाख बेगडी आहे हे आता जगापासून लपून राहिलेले नाही. पाकिस्तानातून येणाऱ्या ताज्या बातमीने तर अब्रूची उरलीसुरली लक्तरेही वेशीवर टांगली गेली आहेत. एप्रिलच्या अखेरीस पाकिस्तानात गहू कापणीचा हंगाम सुरू होतो आणि तिथून पुढे दोन-तीन आठवडे चालतो. गव्हाची कापणी, मळणी, साफसफाई आणि शेतकऱयांकडून बाजारपेठा आणि सरकारी गोदामापर्यंत गहू पोहोचण्यास दीडेक महिन्याचा कालावधी सहज जातो. या कालावधीत गव्हाचे सगळेच राखीव साठे संपले तर पाकिस्तानी जनतेने खायचे काय, हा प्रश्न तर निर्माण होईलच, पण नागरिकांमध्ये जो असंतोष पसरेल त्याला तोंड कसे द्यायचे याची चिंता पाकिस्तान सरकारला नक्कीच सतावत असेल. आधीच इम्रान खान यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानात आर्थिक अराजक पसरले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख