काँग्रेसच्या त्या तेवीस 'लेटरबॅाम्ब' नेत्यांची नाराजी दूर होईल का ? आज बैठक.. - Politic news sonia gandhi convenes important meeting will discuss with leaders to strengthen congress | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसच्या त्या तेवीस 'लेटरबॅाम्ब' नेत्यांची नाराजी दूर होईल का ? आज बैठक..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 डिसेंबर 2020

तेवीस नाराज नेत्यांची आज दिल्लीत सोनिया गांधींच्या 10 जनपथ या निवासस्थानी बैठक आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना दोन महिन्यापूर्वी पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी संघटनात्मक रचनेत बदल  करण्यासोबत नव्या नेतृत्वाचा आग्रह धरला आहे. आम्ही सोनिया अथवा राहुल यांच्या नेतृत्वावर टीका केलेली नाही, केवळ बदलांचा आग्रह धरला असल्याचेही त्या नेत्याने सांगितले. हे पत्र या सर्व नेत्यांनी 7 ऑगस्टला सोनियांना लिहिले होते. बिहार निवडणुकीतील पराभवानंतर त्यावर पक्षांतर्गत विचारमंथन झाले नाही. पक्षाचे नेतृत्वही जबाबदारी घेताना दिसत नाही, अशी खंतही पत्रात व्यक्त केली आहे 

या 23 नाराज नेत्यांची आज दिल्लीत सोनिया गांधींच्या 10 जनपथ या निवासस्थानी बैठक आहे. या नेत्यांची सोनिया गांधींच्या सोबत बैठक आयोजित करण्यात कमलनाथ यांनी पुढाकार घेतला आहे. डॉ मनमोहन सिंह, एके अॅन्टनी, पी चिदंबरम, गुलाम नबी आझाद, आंनद शर्मा, शशी थरूर, भूपिंदर सिंह हुड्डा, केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, हरीश रावत यांच्या सोबत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील या बैठकीत भाग घेणार आहेत. कमलनाथही या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. अनेक दिवसापासून कॉंग्रेसच्या धोरणांवर नाराज असलेल्या नेत्यांचीही सोनिया गांधी भेट घेणार आहेत. सोनिया गांधींनी बोलावलेल्या या बैठकीनंतर असंतुष्ट नेते परत पक्षात सक्रिय होतील अशी चिन्हं आहेत.  
 
नेतृत्व बदलासाठी सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद, उपनेते आनंद शर्मा, माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा, पृथ्वीराज चव्हाण, राजिंदरकौर भट्टल, माजी मंत्री मुकूल वासनिक, कपिल सिब्बल, एम. वीरप्पा मोईली, शशी थरूर, मनिष तिवारी तसेच, माजी खासदार मिलिंद देवरा, जितीन प्रसाद आणि संदीप दिक्षित यांचा समावेश आहे. याशिवाय राज बब्बर, अरविंदसिंग लव्हली, कौलसिंह ठाकूर, अखिलेशप्रसाद सिंह आणि कुलदीप शर्मा या प्रदेशाध्यक्षांनीही बदलांची मागणी केली आहे.

काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांच्या निकटवर्ती नेत्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीला पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी पक्षाची धुरा ही पुन्हा राहुल यांच्याकडेच सोपवावी, अशी मागणी केली आहे. या गटाने पुन्हा राहुल यांनाच पक्षाचे अध्यक्ष केले जावे म्हणून आग्रह धरला आहे, विद्यमान खासदार मणिक्कम टागोर यांनी पुन्हा राहुल यांनाच पक्षाचे अध्यक्ष केले जावे, अशी आग्रही मागणी केली आहे. टागोर यांच्याप्रमाणेच छल्ला वामशी रेड्डी, तेलंगणमधील काही माजी आमदार आणि महाराष्ट्राच्या प्रदेश सचिवांनी राहुल यांनाच अध्यक्ष केले जावे, अशी मागणी केली आहे.

Edited  by : Mangesh Mahale     
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख