शेतकऱ्यांच्या हिताविषयी बोलणे हा खरा राष्ट्रवाद..पायलटांचा आरएसएसला टोला - Politic Congress leader Sachin Pilot slams BJP over Farm laws  | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांच्या हिताविषयी बोलणे हा खरा राष्ट्रवाद..पायलटांचा आरएसएसला टोला

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 4 जानेवारी 2021

काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी कृषी कायद्यांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्र सरकारवर निशाना साधला आहे.

जयपूर : काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी कृषी कायद्यांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. काल ते जयपूर येथे बोलत होते.

सचिन पायलट म्हणाले की तुम्ही लव्ह जिहादसाठी कायदे बनवत आहात. तुम्हाला लग्नासारख्या गोष्टींवर चर्चा करायला वेळ आहे. मात्र, तुमच्याकडे शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. हा म्हणजे शेतकऱ्यांचे भवितव्य अंधारात लोटण्याचा प्रकार आहे. हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देण्याला राष्ट्रवाद म्हणत नाहीत. तर शेतकऱ्यांच्या हिताविषयी बोलणे हा खरा राष्ट्रवाद आहे.

दिल्लीच्या सीमेवर कडाक्‍याच्या थंडीतही गेला महिनाभर धरणे आंदोलन सुरू आहे. गेल्या 40 दिवसांपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसल्या आहेत. कृषी कायद्यांविरोधात आतापर्यंत केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये सहावेळा चर्चा झाली. मात्र, या सर्व बैठका निष्फळ ठरल्या आहेत. 

शेतकरी संघटना आपल्या कार्यक्रमपत्रिकेतील पुढील ४ मुद्यांवरच त्याच क्रमाने चर्चा करू इच्छितात...
१) तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया
२) हमीभाव प्रक्रियेला (एमएसपी) कायदेशीर स्वरूप देणे व अनेक पिकांच्या एमएसपीची खात्री
३) दिल्ली-एनसीआरमधील वायू प्रदूषणावरून शेतात काडीकचरा जाळणारांविरूध्द शिक्षेची प्रस्तावित तरतूद रद्द करणे
४) केंद्रातर्फे प्रस्तावित नव्या वीज कायद्याचे विधेयक मागे घेणे.

बुधवारी केंद्राची झालेल्या सहाव्या बैठकीत दोन मुद्यांवर सहमती झाली होती. प्रस्तावित वीज अधिनियम दुरुस्ती कायद्यात बदल केले जाणार आहे. वीज वापरावर शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान पूर्वीप्रमाणे कायम राहील. तसेच प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील अध्यादेशातही दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख