एक ट्विट भोवले... 'द वायर'चे संपादक वरदराजन यांच्यावर गुन्हा दाखल - UP Police registered FIR against the wire editor siddharth varadrajan | Politics Marathi News - Sarkarnama

एक ट्विट भोवले... 'द वायर'चे संपादक वरदराजन यांच्यावर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
रविवार, 31 जानेवारी 2021

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर 'द वायर'चे संपादक सिध्दार्थ वरदराजन यांनी त्यावर ट्विट केले होते. हे ट्विट वादग्रस्त असल्याचे सांगत उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर 'द वायर'चे संपादक सिध्दार्थ वरदराजन यांनी त्यावर ट्विट केले होते. हे ट्विट वादग्रस्त असल्याचे सांगत उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे ट्विट भडकावणारे, राष्ट्रीय एकतेला प्रतिकूल आणि हिंसा घडविणारे असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

दिल्लीमध्ये शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागले होते. यादरम्यान एका शेतकऱ्याला आपले प्राण गमवावे लागले. पोलिसांची गोळी लागून त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला होता. तर ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली दबल्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यावरून शेतकरी अधिक आक्रमक झाले होते. शेतकऱ्याचा मृतदेह तिरंग्यात लपेटून रस्त्यावरच ठेवण्यात आला होता. परिणामी परिसरात तणावर वाढला होता. 

यासंदर्भात सिध्दार्थ वरदराजन यांनी 30 जानेवारीला एक ट्विट केले होते. 
शेतकऱ्याच्या कुटूंबियांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ट्विट केल्याचे त्यांनी म्हटले होते. 'नवरीत सिंह डिबडिया या शेतकऱ्याचा मृत्यू गोळी लागून झाला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन केलेल्या डॉक्टरांपैकी एकाने यांसदर्भात सांगितले होते. पण डॉक्टरांचे हात बांधलेले आहेत, असे ते म्हणाले,' असे ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरने त्यासंदर्भात शेतकऱ्याचे कुटूंबीय किंवा अन्य कोणाशीही बोललो नसल्याचे निवेदन प्रसिध्द केले आहे. हे निवेदन रामपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत वरदराजन यांना टॅग करून प्रसिध्द केले आहे. त्यामध्ये त्यांनी सत्य परिस्थितीच द्या, असेही म्हटले आहे. 

उत्तर प्रदेश पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शवविच्छेदन अहवालामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू गोळी लागून झाला नसल्याचे स्पष्टपणे दिसते. ट्रॅक्टर पलटी होऊन जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख