असाही प्रचार : लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो वादात...

कोरोना लस घेतल्यानंतर लाभार्थींना लसीकरणाचे प्रमाणपत्र दिले जात आहे.
PM Narendra Modis photo still appearing on vaccination certificate
PM Narendra Modis photo still appearing on vaccination certificate

नवी दिल्ली : कोरोना लस घेतल्यानंतर लाभार्थींना लसीकरणाचे प्रमाणपत्र दिले जात आहे. या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यात आला आहे. हा फोटो आता वादात सापडला असून त्यावरून राजकारण सुरू झाले आहे. प्रमाणपत्रावरील हा फोटो काढण्यासाठी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभरात 1 मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. या टप्प्यात 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसह अन्य आजार असलेल्या 45 वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जात आहे. तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आधापासूनच ही लस दिली जात आहे. लस घेतल्यानंतर लाभार्थ्यांना डिजिटल किंवा प्रिंटेड स्वरूपात लसीकरण प्रमाणपत्र दिले जात आहे.

प्रमाणपत्रावर लस घेणाऱ्याची प्राथमिक माहिती, लस घेतल्याची तारीख, ठिकाण तसेच लस देणाऱ्याची माहिती आहे. त्याखाली हिंदी व इंग्रजीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश व त्यासोबत त्यांचा फोटो आहे.  मोदी यांच्या या फोटावरून राजकारण सुरू झाले आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.

ओब्रायन यांनी याबाबत ट्विट केले आहे. ते म्हणाले, ''निवडणूक जाहीर झाली आहे. पंतप्रधान मोदी अजूनही कोविड 19 च्या प्रमाणपत्रावर आहेत. तृणमूलकडून हा मुद्दा निवडणूक आयोगाच्या निर्दशनास आणून दिला जाईल.'' पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून काही नेटकऱ्यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे. राजकीय लाभ उठविण्यासाठी लसीकरण कार्यक्रमाचा वापर केला जात असल्याची टीका काहींनी केली आहे. 

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, अभिनेते कमल हसन, काँग्रेसचे नेते अजय माकन यांच्यासह अनेकांनी लस टोचून घेतली. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेत या टप्प्याला सुरूवात केली. त्यानंतर देशभरातील अनेक नेत्यांनी लस घेतली. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com