कोलकता : आगामी पश्चिम बंगाल निवडणूकीत भाजपकडून 'राम कार्ड'च चालविले जाणार असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना येथील जनताच 'राम कार्ड' दाखवेल, असे म्हणत त्याचे संकेत दिले.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रविवारी पश्चिम बंगालमध्ये विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत मोदींनी ममतादीदींवर जोरदार टीका केली. काही दिवसांपुर्वीच एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी व ममता बॅनर्जी एकाच व्यासपीठावर होते. यावेळी काहींनी जय श्रीरामचे नारे दिले. त्यानंतर ममतादीदींनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त करून भाषण थांबविले. त्यावरून भाजपने त्यांच्यावर टीका केली होती.
आज पंतप्रधान मोदी टीका करताना म्हणाले, ''पश्चिम बंगालचे फूटबॉलवर प्रेम आहे. मी फूटबॉलच्याच भाषेत बोलतो. तृणमुलने एकामागून एक अनेक चूका केल्या आहेत. गैरकारभार, विरोधी नेत्यांवर हल्ले, भ्रष्टाचार या चूका बंगालची जनता पाहत आहे. आता बंगाल लवकरच तृणमुलला 'राम कार्ड' दाखवेल.'' असे वक्तव्य करून पंतप्रधानांनी तृणमुलला एकप्रकारे संदेश दिला आहे.
तृणमुलवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले, “आजच्या परिस्थितीला येथील राजकारण कारणीभूत आहे. विकासाचे राजकारण झाले नाही. काँग्रेसच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. डाव्यांच्या काळात भ्रष्टाचार बोकाळला आणि विकास ठप्प झाला. त्यानंतर ममतांवर लोकांनी विश्वास ठेवला. पण त्यांनी अनेक चूका करून जनतेचे शोषण केले.
तृणमुल, डावे, काँग्रेसचे मॅच फिक्सिंग
आगामी निवडणूकीत खरी लढाई तृणमुल सोबत असल्याचे सांगत मोदी म्हणाले, त्यांच्या छुप्या मित्रांपासून आपल्याला सावध राहावे लागेल. पडद्यामागे डावे, तृणमुल आणि काँग्रेसचे मॅच फिक्सिंग होत आहे. डावे आणि काँग्रेसला मत म्हणजे त्यांच्या मॅच फिक्सिंगमध्ये अडकल्यासारखे आहे. दिल्लीत ते राजकारणावर चर्चा करतात. तर केरळमध्ये डावे व काँग्रेसने राज्याला लुटण्याचा करारच केला आहे. अशा शब्दांत पंतप्रधानांनी निशाणा साधला.
तेव्हा ममतादीदी उदासीन होता
बंगालमधील लोक जेव्हा त्यांच्या हक्कांविषयी विचारतात, तेव्हा ममतादीदी रागवतात. भारत माता की जय असे नारे दिल्यानंतरही त्या उदासीन होता. पण देशाला बदनाम करण्याच्या षडयंत्राविषयी त्या बोलत नाहीत, अशी टीकाही पंतप्रधानांनी केली.

