पंतप्रधानांचे नाव रेशनकार्डवर नाही, मग ते माझ्या कुटूंबातील कसे? प्रल्हाद मोदींचा सवाल

प्रल्हाद मोदी यांची मुलगी सोनल मोदी यांना उमेदवारांसाठीच्या नवीन नियमांमुळे तिकीट नाकारण्यात आले आहे. नेत्यांच्या नातेवाईंकांना तिकीट न देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
PM Narendra Modi Name not in rationcard
PM Narendra Modi Name not in rationcard

अहमदाबाद : केंद्र सरकारने कुटूंबाची एक व्याख्या केली आहे. त्यानुसार रेशनकार्डवर नाव असलेल्या सर्व व्यक्ती त्या कुटूंबाचे सदस्य असतात. आमच्या कुटूंबाच्या रेशनकार्डवर नरेंद्र दामोदरदास मोदी यांचे नाव नाही. मग ते आमच्या कुटूंबातील सदस्य कसे?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी उपस्थित केला आहे. 

प्रल्हाद मोदी यांची मुलगी सोनल मोदी यांना उमेदवारांसाठीच्या नवीन नियमांमुळे तिकीट नाकारण्यात आले आहे. नेत्यांच्या नातेवाईंकांना तिकीट न देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यामुळे सोनल यांना तिकीट दिले नसल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. यावरून प्रल्हाद मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'बीबीसी'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावरून रोखठोक मतं मांडली आहेत. 

प्रल्हाद मोदी म्हणाले, आम्ही नरेंद्र मोदींचे नावाचा वापर करून दैनंदिन जीवन जगत नाही. कुटूंबातील प्रत्येक सदस्य कष्ट करून कमावतो. माझेही एक दुकान आहे. नरेंद्र मोदींनी 1970 मध्ये घर सोडले असून आता ते संपुर्ण भारतालाच आपले घर मानतात. भारतातील सर्वजण त्यांचे भाऊ-बहीण आहेत, असे तेच सांगतात. मग, अशावेळी उमेदवारीचा नियम आम्हाला कसा लागू होतो? कुटूंबातील सदस्यांचे रेशनकार्डवर नाव असावे, हा सरकारचाच नियम आहे. त्याचे पालन पक्षासह सर्वांनी करायला हवे.

सोनल यांनी निवडणूक लढविली तर त्या मोदींच्या पुतणी आहेत, असे लोक म्हणतील. या प्रश्नावर बोलताना प्रल्हाद मोदी यांनी हे नाते वास्तव असल्याचे सांगितले. पण जर तुम्ही चौकशी केली तर समजेल की, सोनल कधी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी गेली आहे का? त्यानंतर आपल्याला समजेल की हे संबंध किती मजबूत आहेत. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या घराचा दरवाजा कसा दिसतो हे मलाही माहिती नाही. मग माझ्या मुलांना कसे माहिती होईल?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नरेंद्र मोदी आईला भेटायला येतात. पण त्यावेळी घरातील अन्य सदस्यांनी तिथे असू नये, अशा स्पष्ट सूचना असल्याचे सांगत प्रल्हाद मोदी म्हणाले, सुरूवातीच्या काळात ते जेव्हा आईला भेटायला यायचे तेव्हा लहान भावाचे कुटूंब दिसायचे. पण आता असे होत नाही. मागील काही वर्षांत त्यांच्यासोबत आईशिवाय कोणाचेही छायाचित्र दिसत नाही. जर पक्ष आम्हाला त्यांच्या कुटूंबातील समजत असेल तर ती पक्षाची भूमिका आहे, असेही प्रल्हाद मोदी यांनी स्पष्ट केले.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com