विमानात बसलेल्या मोदींना आवरला नाही भारत-इंग्लंड मॅच पाहण्याचा मोह... - PM Narendra Modi Clicks photo of India Vs England match | Politics Marathi News - Sarkarnama

विमानात बसलेल्या मोदींना आवरला नाही भारत-इंग्लंड मॅच पाहण्याचा मोह...

वृत्तसंस्था
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

भारत व इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामनाही चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू आहे.

चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तमिळनाडूच्या दौऱ्यावर होते. तर भारत व इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामनाही चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू आहे. भारतीय संघाने या कसोटीवर आपली पकड मजबूर केली आहे. या रंगतदार कसोटीचा आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशातून लुटला. चेन्नईतील हवाई प्रवासादरम्यान त्यांनी या स्टेडिअमचे छायाचित्र काढून ट्विट केले आहे. 

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज तमिळनाडूमध्ये विविध योजनांचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर ते केरळच्या दौऱ्यावर गेले. आज भारत आणि इंग्लंडमधील दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. ही कसोटी अत्यंत रंगतदार अवस्थेत पोहचली आहे. भारताने इंग्लंडला पहिल्या डावात 134 धावांवर रोखले. त्यामुळे भारताला  198 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारताची फलंदाजी सुरू असून आतापर्यंत या कसोटीवर भारताचे वर्चस्व राहिले आहे. 

रंगतदार अवस्थेत पोहचलेल्या हा कसोटी सामना पाहण्याचा मोह पंतप्रधान मोदींनाही आवरला नाही. तमिळनाडूतील हवाई प्रवासादरम्यान त्यांनी चेन्नईतील स्टेडिअमचे छायाचित्र काढून ट्विट केले आहे. त्यामध्ये रंगतदार कसोटीतील क्षणभंगूर दृश्य टिपल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच बॅट-बॉलचा इमोजी आणि भारत व इंग्लंडचे ध्वजही टाकले आहेत. 

भारताने नुकतेच अॉस्ट्रेलियाला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभव केले आहे. या मालिकेत सुरूवातीला भारताची दयनीय स्थिती झाली होती. पण खेळाडूंनी केलेल्या पराक्रमाने भारताने मालिकेवर वर्चस्व मिळविले. यावेळीही पंतप्रधान मोदींनी खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले होते. 'मन की बात'मध्ये त्यांनी या टीम इंडियाचा खेळ प्रेरणादायी असल्याचे म्हटले होते. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख