पंतप्रधान हसीना शेख यांच्या 'कमळ' साडीवर नेटकऱ्यांचे टीकास्त्र - pm Narendra modi bangladesh pm sheikh hasina photos goes viral for lotus design | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधान हसीना शेख यांच्या 'कमळ' साडीवर नेटकऱ्यांचे टीकास्त्र

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 मार्च 2021

नेटकऱ्यांचे लक्ष बांगलादेशच्या पंतप्रधान हसीना शेख यांच्या साडीवरील कमळाकडे गेलं आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा बांगलादेश दैारा संपला असला तरी त्याचे कवित्व अजून संपलेले दिसत नाही. या दैाऱ्यात नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानामुळे विरोधकांनी तसेच नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. मोदींचा दैारा हा भाजपपेक्षा त्यांच्या विरोधकांनीच चांगला गाजविला. मोदींच्या भाषणावर विरोधकांनी टीका केल्यानंतर आता नेटकऱ्यांचे लक्ष बांगलादेशच्या पंतप्रधान हसीना शेख यांच्या साडीवरील कमळाकडे गेलं आहे. 

नरेंद्र मोदी यांनी ता. 26 मार्च रोजी बांगलादेश मुक्तीलढ्यातील हुतात्मांना आदरांजली वाहिली होती, या कार्यक्रमात शेख हसीना आणि मोदी यांनी सैन्याचे अभिवादन स्वीकारण्यासाठी चालत एकत्र मंचाकडे गेले होते. त्यावेळी शेख हसीना यांनी हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. त्या साडीवर कमळाचे नक्षीकाम आहे, असा शोध नेटकऱ्यांनी लावला आहे. कमळ हे भाजपचे चिन्ह असल्यामुळे भाजप प्रचार करीत असल्याचा आरोप सोशल मीडियावरून करण्यात येत आहे. मोदी आणि शेख हसीना यांचा हा फोटो शेअर करत अनेकांनी हसीना यांच्या साडीच्या पदराभोवती गोल करुन त्यांनी कमळाचं नक्षीकाम असणारी साडी नेसल्याचं लक्षात आणून दिलं आहे. 
 
मोदींनी २६ मार्चला बांगलादेश मुक्तीलढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली होती. या सर्व हुतात्म्यांनी सत्याच्या विजयासाठी अन्यायायाविरोधात लढा दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. बांगलादेशच्या राष्ट्रीय दिनानिमित्त नॅशनल परेड स्क्वेअरमध्ये आयोजित कार्यक्रमात मोदींनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी बांगलादेश मुक्तीसंग्रामाबाबत भाषण केले होते. विशीमध्ये असतानाच मी माझ्या सहकाऱ्यांसोबत तेव्हा माझ्या आयुष्यातील पहिले आंदोलन केले होते. त्यावेळी मी बांगलादेशसाठी तुरुंगवासही भोगला होता, असे मोदी यावेळी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार खिल्ली समाजमाध्यमातून उडवली जात आहे. 

मोदींनी या भाषणात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते की, आजचा दिवस हा वंगबंधूंचे आदर्श आणि त्यांनी दाखवून दिलेल्या दूरदृष्टीवर वाटचाल करण्याचा आहे. मुक्तियोद्ध्यांच्या भावनांचे स्मरण करण्याची हीच वेळ आहे. बांगलादेशच्या मुक्तीलढ्याला भारताच्या कानाकोपऱ्यातून मोठा पाठिंबा मिळाला होता. या लढ्यातील इंदिरा गांधींचे योगदान सर्वांनाच माहिती आहे. खुद्द अटलबिहारी वाजपेयींनी या मुक्तीलढ्यातील क्रांतिकारकांचे कौतुक केले होते. माझ्या आयुष्यात बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. 
  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख