रामाच्या भारतात पेट्रोल का महाग यावर पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान म्हणतात... - petrol and disel prices are not all time high says dharmendra pradhan | Politics Marathi News - Sarkarnama

रामाच्या भारतात पेट्रोल का महाग यावर पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान म्हणतात...

वृत्तसंस्था
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

देशात पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत चालले आहेत. विरोधकांकडून वाढत्या दरांवरून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.

नवी दिल्ली : देशात पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत चालले आहेत. विरोधकांकडून वाढत्या दरांवरून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही सरकारला घरचा आहेर दिला. 'सीतेच्या नेपाळमध्ये आणि रावणाच्या लंकेत रामाच्या भारतापेक्षा पेट्रोल स्वस्त असल्याचे ट्विट स्वामी यांनी केले होते.

आज राज्यसभेतही रामाच्या भारतात पेट्रोल महाग का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी शेजारील देशांशी तुलना करू नका, असे उत्तर दिले. 

केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोलवर अडीच रुपयांचा आणि डिझेलवर चार रुपयांचा शेती उपकर लावला.  इंधनाचे दर कमी होतील, ही मध्यमवर्गीयांची अपेक्षा फोल ठरली. अबकारी कराच्या रकमेतून सरकार वर्षाला सुमारे दीड ते दोन लाख कोटी रुपये वसूल करत आहे. इंधनाचे दर हे अर्थसंकल्पानंतर उतरणार असल्याची अपेक्षा फोल ठरली. त्यानंतर विरोधकांबरोबरच सुब्रमण्यम स्वामीही सरकारवर टीका करायला सरसावले. 

नेपाल ही सीतेची जन्मभूमी मानली जाते. तर लंका ही रावणाची हे सर्वश्रुत आहे. या दोन्ही देशांमध्ये पेट्रोलचे दर भारतापेक्षा निम्म्याने कमी असल्याचे स्वामी यांनी दाखवून दिले. सीतेच्या नेपाळमध्ये पेट्रोल ५३ रुपये प्रतीलिटर, रावणाच्या लंकेत ५१ रुपये प्रतीलिटर तर रामाच्या भारतात ते ९३ रुपये कमी आहे, असा चिमटा स्वामी यांनी काढला. त्यानंतर समाजवादी पक्षाचे खासदार विश्वंभर प्रसाद निषाद यांनी हाच मुद्दा उपस्थित करून रामाच्या देशात सरकार पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणार का? असा प्रश्न विचारला.

यावर उत्तर देताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले, या देशांसोबत भारताची तुलना करणे चुकीचे आहे. कारण तिथे पेट्रोल-डिझेलचा वापर करणारे कमी आहेत. रॉकेलच्या दरात भारत व इतर देशांमध्ये खूप अंतर आहे. बांग्लादेश व नेपाळमध्ये रॉकेलचे दर प्रति लिटर 57 ते 59 रुपये एवढे आहे. तर भारतात रॉकेल केवळ 32 रुपये प्रति लिटर मिळते. 

काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल यांनी देशात पेट्रोल व डिझेलच्या किंमती सर्वाधिक असल्याचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला होता. तसेच क्रुड तेलाच्या किंमती मात्र आतापर्यंतच्या सर्वाधिक नसल्याचे ते म्हणाले.  त्यावर बोलताना प्रधान म्हणाले, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड तेलाच्या किंमती 61 डॉलरवर पोहचल्या आहेत. त्यामुळे सध्या आपल्या इंधनावरील कराबाबत खूप सावधपणे निर्णय घ्यावे लागतील. 

मागील 300 दिवसांतील केवळ 60 दिवसच इंधनाचे दर वाढले आहेत. पेट्रोलचे दर सात दिवस कमी करण्यात आले. तर डिझेलच्या किंमती 21 दिवस कमी केल्या. जवळपास 250 दिवस किंमतीमध्ये कोणताच बदल झाला नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर सर्वाधिक असल्याचे म्हणणे अतार्किक आहे, असेही प्रधान यांनी स्पष्ट केले.

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख