विमान प्रवाशांनो... खबरदार ! नियम मोडल्यास 'नो फ्लाय' लिस्टमध्ये ! - Passengers to be put on 'no-fly' list for violating COVID-19 norms: Hardeep Puri | Politics Marathi News - Sarkarnama

विमान प्रवाशांनो... खबरदार ! नियम मोडल्यास 'नो फ्लाय' लिस्टमध्ये !

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

कोरोनाकाळातील कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित प्रवाशाला 'नो फ्लाय' लिस्टमध्ये टाकावे, अशा सूचना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी देशातील सर्व विमानतळ अधिकाऱ्यांना दिल्या. नो फ्लाय लिस्टमध्ये टाकल्यानंतर संबंधित प्रवाशाला भविष्यात कोणत्याही ठिकाणी उड्डाण करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

नवी दिल्ली: देशातील कोरोनाची स्थिती गेल्या दीड-दोन महिन्यांपासून गंभीर बनली आहे. परिणामी सर्वांनीच काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, अद्यापही काही नागरिकांकडून कोरोना काळात घालून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही.  एखाद्या प्रवाशाने मास्क, फेस शिल्ड घातला नसेल किंवा कोरोनाकाळातील कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित प्रवाशाला नो फ्लाय लिस्टमध्ये टाकावे, अशा सूचना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी देशातील सर्व विमानतळ अधिकाऱ्यांना दिल्या. नो फ्लाय लिस्टमध्ये टाकल्यानंतर संबंधित प्रवाशाला भविष्यात कोणत्याही ठिकाणी उड्डाण करता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. 

पुरी म्हणाले, कोरोनाशी आपण सर्वच लढत असून केवळ काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना त्याचा भुर्दंड सोसावा लागतो. आम्ही प्रवाशांना नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्यास सुरूवात केली आहे. कोरोना काळात रेल्वे, बसची तुलना केल्यास विमान प्रवास सर्वात सुरक्षित आहे. परंतु, नागरिकांनी घालून दिलेले नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

पुरी पुढे बोलताना म्हणाले, उडाण योजनेमुळे भारतात ठिकठिकाणी कमी पैशात उत्तम कनेक्टिव्हिटी मिळाली. ही योजना अल्पावधीतच यशस्वी झाली असून अनेक मार्गांवरील तिकिटाचे दर रेल्वेच्या एसी चेअर कारच्या तिकिटापेक्षाही कमी आहेत. येत्या काळात देशात नव्याने 100 विमानतळ बांधण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या असणाऱ्या 300 मार्गांवरील सेवा आता एक हजारच्या घरात घेऊन जाणार आहे. कोरोनाकाळात लोक विमानास अधिक प्राधान्य देऊ लागले असून येत्या काही वर्षांत विमान प्रवाशांना चांगल्या सेवा उपलब्ध होण्यासाठी बहुतांश विमानतळांचे खासगीकरण करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात गुरूवारी 59 हजार 118 जणांना कोरोनाचे निदान झाले तर 32 हजार 987 जण बरे झाले. 257 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख