इमरान खान म्हणाले, "आम्ही भारतासोबत आहोत..." पाकिस्तान देणार भारताला ५० अॅम्बुलन्स.. - Pakistan offers Covid-19 relief to India Imran Khan | Politics Marathi News - Sarkarnama

इमरान खान म्हणाले, "आम्ही भारतासोबत आहोत..." पाकिस्तान देणार भारताला ५० अॅम्बुलन्स..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

शाह महमूद कुरैशी यांनी  भारताला आवश्यक ती मदत देणार असल्याचे सांगितले आहे.

इस्लामाबाद : भारतातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्सनंतर आता पाकिस्तानने चिंता व्यक्त केली आहे. ''कोरोनाच्या लढाईत आम्ही भारतासोबत आहोत, एकत्र मिळून आपण कोरोनाशी मुकाबला करू या,'' असं  पंतप्रधान इमरान खान यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. 

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनीही याबाबत टि्वट करून भारताला आवश्यक ती मदत देणार असल्याचे सांगितले आहे. दोन्ही देश कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असून भारताल व्हेंटिलेटर, तसेच अन्य वैद्यकीय मदत देणार असल्याचे पाकिस्ताने सांगितले आहे. पाकिस्तानचे मंत्री फवाद चैाधरी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे की, आम्ही या परिस्थितीत भारतासोबत आहोत. कोरोनाचे संकट लवकर संपले, अशी प्रार्थना करू या. 

पाकिस्तानमधील ईधी वेलफेयर ट्रस्टचे भारताला ५० अॅम्बुलन्स व वैद्यकीय पथक देणार असल्याचे जाहीर केलं आहे. ट्रस्टचे अध्यक्ष फैसल ईधी यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. पण पाकिस्तानने दिलेल्या मदतीचा हाकेला भारताने अद्याप कुठलेही उत्तर दिलेले नाही.

भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. राज्यांना आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड्सचा तुटवडा जाणवत असताना अनेक देशांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मात्र अद्यापही देशातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही.
 
भारतात सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. भारतात गेल्या २४ तासांत साडे तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दोन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

गेल्या २४ तासांत ३ लाख ५२ हजार ९९१ करोना रुग्ण आढळले आहेत. यासोबत एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ इतकी झाली आहे. तर २८१२ जणांचा मृत्यू झाला आहे.  आतापर्यंत १ लाख ९५ हजार १२३ जणांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासांत २ लाख १९ हजार २७२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४ हजार ३८२ जणांनी करोनावर मात केली आहे. 

पाकिस्तानमध्ये आतापर्यंत  ८ लाख जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी १७  हजार जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानमधील एकूण कोरोना रुग्णांपैकी ६ लाख ८६ हजार ४८८ जण बरे झाले. सध्या पाकिस्तानमध्ये ८६ हजार ५२९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पंतप्रधान इमरान खान यांनी देशात कोविड प्रोटोकॉलचे प्रभावीरित्या पालन व्हावे, यासाठी लष्कराची मदत घेणार असल्याचे जाहीर केले. 
 
Edited by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख