Pakistan benefits from onion export ban: Sharad Pawar | Sarkarnama

कांदा निर्यातबंदीचा फायदा पाकिस्तानला : शरद पवार 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

अशा आकस्मिक निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून जी प्रतिमा आहे, तिला मोठा धक्का बसतो

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर घालण्यात आलेली बंदी त्वरित उठवण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज (ता. 15 सप्टेंबर) केली. अशा आकस्मिक निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून जी प्रतिमा आहे, तिला मोठा धक्का बसतो, याची जाणीव पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांना करून दिली. भारताच्या ताज्या निर्णयाचा फायदा पाकिस्तान व अन्य कांदा निर्यातदार देशांना होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. 

पवार यांनी आज सकाळी संसदेत गोयल यांची भेट घेऊन केंद्राच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. ही निर्यातबंदी तातडीने लागू करण्यात आली असून त्याबद्दल कांदा उत्पादकांमध्ये तीव्र रोष आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कांद्याला चांगली मागणी आहे आणि आपण सातत्याने कांदा निर्यात करतही आलो आहोत. मात्र, सरकारच्या अशा आकस्मिक निर्णयामुळे कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताच्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो. या परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना मिळतो,' असंही शरद पवार यांनी पियूष गोयल यांच्या निदर्शनास आणून दिले. 

कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातर्फे बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केल्याचे गोयल यांनी सांगितले. वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय या तीनही मंत्रालयांशी चर्चा करून या निर्यातबंदीचा फेरविचार करण्याचे व तिन्ही मंत्रालयांचे एकमत झाले, तर निर्यातबंदीचा पुनर्निर्णयही घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे पवार यांनी सांगितले. 

"केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केल्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सोमवारी रात्री माझ्याशी संपर्क साधून केंद्र सरकारला उत्पादकांच्या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केली, त्यानुसार मी गोयल यांच्याशी चर्चा केली आहे,' असे पवार म्हणाले. 

ते म्हणाले की कांदा उत्पादक हे जिरायत शेतकरी आहेत. हा बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची प्रतिमा एक बेभरवशाचा देश अशी बनण्याची शक्‍यता बळावते. ती आपल्याला परवडणारी नाही. या परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना मिळतो.' 

या सर्व गोष्टींचा विचार करून कांदा निर्यातबंदी बाबत फेरविचार करावा, अशी विनंतीही शरद पवार यांनी या वेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली. 

दरम्यान, दिंडोरीच्या खासदार भारती पवार आणि धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांनीही गोयल यांची भेट घेतली आणि कांदा उत्पादकांच्या समस्या त्यांच्या कानावर घातल्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख