अॅाक्सीजन टँकरच हरवला! गुन्हा दाखल, पोलिस घेतायेत शोध... - Oxygen Shortage Liquid oxygen tanker has gone missing in haryana | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

अॅाक्सीजन टँकरच हरवला! गुन्हा दाखल, पोलिस घेतायेत शोध...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

देशात अॅाक्सीजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णालयांमधील कोरोनाबाधित रुग्णांवर टांगती तलवार आहे.

चंदीगड : देशात अॅाक्सीजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णालयांमधील कोरोनाबाधित रुग्णांवर टांगती तलवार आहे. अॅाक्सीजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अॅाक्सीजनसाठी धावाधाव सुरू आहे. पण प्रत्यक्षात अपेक्षित पुरवठा होत नसल्याने अॅाक्सीजन सिलेंडरची चोरी झाल्याचा प्रकारही नुकताच समोर आला होता.

वैद्यकीय अॅाक्सीजन उत्पादक कंपन्यांमधून लिक्वीड अॅाक्सीजनचा क्रायोजनिक टँकरमधून रुग्णालयांना पुरवठा केला जात आहे. हरयाणामध्ये पानिपत ते सिरसा या मार्गावरून हा टँकरच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पानिपत येथील कंपनीतून टँकरमध्ये अॅाक्सीजन भरण्यात आला होता. बुधवारी हा टँकर नियोजनाप्रमाणे सिरसाच्या दिशेने निघाला. मात्र, निश्चित ठिकाणी हा टँकर पोहचलाच नाही.

अखेर दोन दिवस उलटून गेल्यानंतरही टँकर पोहचला नसल्याने जिल्हा औषध नियंत्रकांनी टँकर हरवल्याची तक्रार पानिपत पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी टँकरचा शोध सुरू केला आहे. या प्रकारामुळे प्रशासनासह पोलिसही गोंधळून गेले आहेत. अॅाक्सीजन टँकरच गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, आणखी एका घटनेमध्ये पानिपत ते फरीदाबाददरम्यान जाणारा अॅाक्सीजन टँकर रुग्णालयात पोहचला नव्हता. हरयाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांनी हा टँकर दिल्ली सरकारने पळवून नेल्याचा आरोप केला आहे. दिल्लीच्या हद्दीतून टँकर येत असताना तो पळविल्याचा दावा त्यांनी केला आहे.

केंद्र सरकारने अॅाक्सीजन तुटवडा निर्माण झालेल्या राज्यांना पुरवठा करण्यासाठी योजना तयार केली आहे. त्यानुसार सर्वाधिक अॅाक्सीजन पुरवठा महाराष्ट्राला केला जाणार आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अॅाक्सीजन एक्सप्रेसही सोडण्यात आली असून ही गाडी विशाखापट्टणम येथून अॅाक्सीजनने भरलेले टँकर घेऊन महाराष्ट्राकडे निघाली आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख