धक्कादायक : बाजारात बनावट रेमडेसिविर, एकाला 400 इंजेक्शनसह अटक - Owner of a pharmaceutical company arrested for selling fake Remdesivir injections | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

धक्कादायक : बाजारात बनावट रेमडेसिविर, एकाला 400 इंजेक्शनसह अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

आतापर्यंत बाजारात किती बनावट इंजेक्शनची विक्री केली आहे, याची माहिती घेतली जात आहे.

इंदौर : देशात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याने अनेकजण काळाबाजार करत सर्वसामान्य नागरिकांना लुबाडत आहेत. त्यातच आता बनावट रेमडेसिविरचीही बाजारात विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

इंदौर पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरूवारी एका औषध कंपनीच्या मालकाला अटक केल्यानंतर याबाबतची माहिती समोर आली. त्याच्याकडून बनावट रेमडेसिविर औषधाची विक्री केली जात होती. अटक केल्यानंतर त्याच्याजवळ 400 इंजेक्शन सापडली आहेत. विनय शंकर त्रिपाठी असे या व्यक्तीचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त अधिक्षक गुरू प्रसाद पराशर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपाठी याच्या कारमधून 400 इंजेक्शन जप्त करण्यात आली. त्याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर ती बनावट असल्याचे समोर आले. त्याची इंदौरमध्ये पिथमपुर येथे औषध कंपनी आहे. इंजेक्शनच्या तुटवड्याचा गैरफायदा घेत त्याने पैसे कमविण्याचे नियोजन केले होते. हिमाचल प्रदेशातील औषध कंपनीमध्ये या इंजेक्शनची निर्मिती केली जात होती. जप्त करण्यात आलेली इंजेक्शन बाजारात 20 लाख रुपयांनी विकली जाणार होती. 

दरम्यान, त्रिपाठी याने आतापर्यंत बाजारात किती इंजेक्शनची विक्री केली आहे, याची माहिती घेतली जात आहे. या बनावट इंजेक्शनमुळे रुग्णांच्या जीवावर बेतले असल्याची भितीही व्यक्त केली जात आहे. मध्य प्रदेशातही इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. त्याचाच अनेकांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसून येते. 

मध्य प्रदेश, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात रेमडेसिविरचा तुटवडा आहे. औषध कंपन्यांनी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात उत्पादन कमी केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नातेवाईकांची इंजेक्शन मिळविण्यासाठी ससेहोलपट होत आहे. पुण्यामध्ये काल अनेक नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. हीच परिस्थिती राज्यात अनेक भागात पाहायला मिळत आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख