वाद पेटला! राज्यपालांनी काढली जात...चार जण माझ्या जातीचेही नाहीत - OSDs are from three states and belong to four different castes says Jagdeep Dhankar | Politics Marathi News - Sarkarnama

वाद पेटला! राज्यपालांनी काढली जात...चार जण माझ्या जातीचेही नाहीत

वृत्तसंस्था
सोमवार, 7 जून 2021

रविवारी राज्यपालांवर घराणेशाहीचा आरोप केला होता.

कोलकता : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. तृणमूलच्या खासदार महूआ मोईत्रा यांनी रविवारी राज्यपालांवर घराणेशाहीचा आरोप केला होता. त्याला राज्यपालांनी आज प्रत्यूत्तर देत जातीचे कार्ड बाहेर काढले आहे. त्यावरूनही आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. हा वाद आणखी चिघळणार असल्याचे संकेत राज्यपालांनी केलेल्या ट्विटवरून स्पष्ट झाले आहे. (OSDs are from three states and belong to four different castes says Jagdeep Dhankar)

धनकर यांनी रविवारी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करणारे ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी थेट तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. राज्यात कायदाच अस्तित्वात नाही. राज्यातील पोलीस कारवाई करत नाही. लोकशाहीची मुल्य पायदळी तुडवली जात आहेत, असे थेट आरोप त्यांनी केला होता. या ट्विटनंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी रविवारी धनकर यांच्याबाबत गौप्यस्फोट केला. 

हेही वाचा : कोव्हॅक्सिनपेक्षा कोविशिल्ड भारी; जाणून घ्या फरक...

मोईत्रा यांनी राज्यपालांच्या ओएसडीच्या नावांची यादीच ट्विटरवर टाकली. यामधील काही जण राज्यपालांचे नातेवाईक आहेत, तर काही जण त्यांच्या जवळच्या परिचयातील आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. 'एक्सटेन्डेड फॅमिली' हा शब्द वापरत त्यांनी राज्यपालांवर एकप्रकारे थेट घराणेशाहीचा आरोप केला. राज्यपाल त्यांच्या कुटूंबाला घेऊन दिल्लीला परत गेल्यानंतर राज्याची स्थिती सुधारेल, अशी टीका मोईत्रा यांनी केली होती.

मोईत्रा यांनी केलेल्या आरोपांवर धनकर यांनी आज ट्विटरवरून उत्तर दिलं आहे. त्यांनी थेट जातीचा मुद्दा उपस्थित केला आहे. सहा ओएसडी हे नातेवाईक असल्याची माहिती चुकीची आहे. ते ओसीडी तीन वेगळ्या राज्यांतील आहेत. त्यातील चार वेगळ्या जातीचे आहेत. कोणीही माझे जवळचे नातेवाईक नाही. त्यातील चार तर माझ्या जातीचे किंवा राज्यातील नाहीत, असे ट्विट राज्यपालांनी केलं आहे. राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरील लक्ष्य विचलित करण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केली आहे. 

राज्यापालांच्या या ट्विटला मोईत्रा यांनीही लगेच उत्तर दिलं आहे. राज भवनात सहा जणांची नियुक्ती कशी झाली, ही माहिती इथेच द्या. भाजपचा आयटीसेल तुम्हाला यातून बाहेर काढू शकणार नाही. आताच ही माहिती द्या, असे आवाहन मोईत्रा यांनी केलं आहे. 

दरम्यान, मोईत्रा यांनी ट्विट केलेल्या कागदपत्रांमध्ये सहा जणांची नावे आहेत. त्यामध्ये अभुद्योय सिंग शेखावत, अखिल चौधरी आणि किशन धनकर हे राज्यपालांच्या जवळचे नातेवाईक असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच रूची दुबे, प्रशांत दिक्षित आणि श्रीकांत जनार्दन राव हे राज्यपालांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींचे नातेवाईक असल्याचा दावाही मोईत्रा यांनी केला आहे. मोईत्रा यांच्या या ट्विटमुळे बंगालमध्ये राज्यपालविरूद्ध मुख्यमंत्री हा वाद आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख