ओडिशात शाळकरी विद्यार्थ्यांची 'चांदी'...   - Odisha promotes students of class 1 to 8 without exams  | Politics Marathi News - Sarkarnama

ओडिशात शाळकरी विद्यार्थ्यांची 'चांदी'...  

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 17 मार्च 2021

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी विनापरीक्षा उत्तीर्ण 

भुवनेश्वर: ओडिशा राज्यात इयत्ता पहिली ते आठवीदरम्यानच्या विद्यार्थ्यांची चांगलीच चांदी झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा स्कूल अॅण्ड मास एजुकेशन डिपार्टमेन्टने इयत्ता पहिली ते आठवीदरम्यानच्या सर्व विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पुढील वर्गात प्रवेश देणार असल्याचे जाहीर केले. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताही उत्तीर्ण करत थेट पुढील इयत्तेत प्रवेश मिळणार असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ओडिशातील सर्व अनुदानित-विनाअनुदानित शाळांकरिता हा निर्णय लागू असेल.  

देशासह ओडिशा राज्यात कोरोनामुळे शाळा बंद असून पुढील दोन-तीन महिने कोरोनाची परिस्थिती गंभीरच राहील, असे संकेत मिळत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेणे चुकीचे ठरेल, अशी स्पष्टोक्ती ओडिशा स्कूल अॅण्ड मास एजुकेशन डिपार्टमेन्टने दिली. दरम्यान, नव्या शैक्षणिक वर्षात ओडिशातील शाळा सुरू होणार असून पहिले दोन-तीन महिने विद्यार्थ्यांची योग्य पात्रता पातळी येण्याकरिता उपचारात्मक वर्ग (रेमेडिअल क्लासेस) घेतले जावेत, अशा सूचना ओडिशा सरकारने केल्या.

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थितीही गंभीर बनली असून पुढील काही महिने तरी शाळा उघडणे अशक्यच असल्याचे दिसते. त्यामुळे ओडिशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या बाबतीत देखील विनापरीक्षा पुढील इयत्तेत घालण्याचा निर्णय होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख