लशीच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा वाढणार; तज्ज्ञ समितीची मोदी सरकारकडे शिफारस

सध्या देशभरात कोविशिल्डसह कोव्हॅक्सिनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर आहे.
NTAGI recommends increasing gap between two doses of Covishield
NTAGI recommends increasing gap between two doses of Covishield

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा कहर रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. देशात कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. सुरूवातीला या दोन्ही लशींच्या दोन डोसमधील अंतर ४ आठवडे एवढे होते. त्यानंतर कोविशिल्ड लशीच्या डोसमधील अंतर ६ ते ८ आठवडे करण्यात आले. आता पुन्हा हे अंतर वाढवण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात आली आहे. (NTAGI recommends increasing gap between two doses of Covishield)

सध्या देशभरात कोविशिल्डसह कोव्हॅक्सिनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना ठराविक अंतरात डोस देणे गरजेचे असल्याने बहुतेक राज्यांनी दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जात आहे. तर काही राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरण थांबवले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडूनही लशींचा आवश्यक पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

त्यातच केंद्र सरकारच्या लसीकरणविषयक तज्ज्ञ समितीने कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतराबाबत सरकारला महत्वाची शिफारस केली आहे. दोन डोसमधील अंतर वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याची शिफारस समितीने केली आहे. केंद्र सरकारने ही शिफारस मान्य केल्यास पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळू शकतो. मागील तीन महिन्यांत तिसऱ्यांदा दोन्ही डोसमधील अंतर वाढविण्यात आले आहे. मार्च महिन्यात हे अंतर ६ ते ८ आठवडे करण्यात आले होते. अंतर वाढल्याने लशीची परिणामकारकता वाढेल, असे सरकारने त्यावेळी सांगितले होते. तसेच त्यापेक्षा जास्त अंतर असू नये, असेही सरकारने स्पष्ट केलं होतं. कोव्हॅक्सिन लशीच्या दोन डोसमधील सध्याच्या अंतरात कोणताही बदल सुचवलेला नाही.

दरम्यान, कोविशिल्ड ही लस अॅस्ट्राझेनेका व अॅाक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केली आहे. या लशीचा जगातील अनेक देशांमध्ये वापर होत आहे. काही देशांमध्ये लशीच्या दोन डोसमधील अंतर आधीपासून १२ आठवडे करण्यात आले आहे. दोन डोसमधील अंतर अधिक असल्यास परिणामकारकता वाढत असल्याचे संशोधनातून यापूर्वीच सिध्द झाले आहे. सिरम इन्स्टिट्युटकडूनही याबाबत अधिकृतपणे स्पष्टीकरण देण्यात आले होते. भारतात सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. 

कोविशिल्ड लशीचे डोस निर्यात करण्यात 'सिरम'ला अडचणी येत आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने अनेक ठिकाणी तुटवडा जाणवत आहे. अनेक देशांनी सिरमकडे लशीसाठी यापूर्वीच मागणी नोंदवली आहे. पण त्यांनाही लशींचा पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे सिरमच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. भारतात दोन डोसमधील अंतर वाढल्यास लसीकरणावरील ताण कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com