NSA Doval walks out of SCO meet over Pakistan’s map showing J&K as Pak territory | Sarkarnama

पाकच्या खोडसाळपणावर अजित डोवाल चिडले आणि बैठकीतून बाहेर पडले..

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

किस्तानने गेल्याच महिन्यात नकाशा जारी केला होता. त्यात लडाख, सियाचीन आणि गुजरातमधील जुनागढ हा भाग पाकिस्तानचा असल्याचा दावा केला होता. त्यानंतर पाकिस्तान या नकाशाचा खोडसाळपणे वापर करत आहे.

नवी दिल्ली : शांघाय कॉऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) बैठकीमध्ये पाकिस्तानने चुकीचा नकाशा सादर केल्यानं भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बैठक अर्धवट सोडली. एससीओचे अध्यक्ष रशियाने सदस्य देशांच्या राष्ट्रीय सल्लागारांची आॅनलाइन बैठक आयोजित केली होती. यामध्ये आज पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी खोडसाळपणा केला. त्यांनी जाणीवपूर्वक एक खोटा नकाशा सादर केला.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की पाकिस्तानकडून बैठकीच्या आयोजकांनी दिलेल्या सल्ल्याविरोधात आणि नियमांचे उल्लंघन करणारे वर्तन करण्यात आलं आहे. यजमानांसोबत चर्चा केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तात्काळ विरोध करत बैठक सोडली. पाकने यानंतरही दिशाभूल करणारा नकाशा आणि फोटो दाखवणे बंद केलं नाही. पाकिस्तानने गेल्याच महिन्यात नकाशा जारी केला होता. त्यात लडाख, सियाचीन आणि गुजरातमधील जुनागढ हा भाग पाकिस्तानचा असल्याचा दावा केला होता. त्यानंतर पाकिस्तान या नकाशाचा अनेकदा प्रचार करत आहे.

 सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियन महासंघाने राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सचिवांना याबाबत मेसेज पाठवला आहे. यात म्हटलं आहे की, पाकिस्तानने जे केलं त्याचं रशिया कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही आणि आशा आहे की पाकच्या वागण्याचा एससीओमध्ये भारताच्या सहभागावर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबतच्या वैयक्तिक संबंधातही यामुळे फरक पडणार नाही. यापुढच्या कार्यक्रमात अजित डोवाल सहभागी होतील, अशी आशा रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या सचिवांनी व्यक्त केली. 

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही स्थायी आंतरसरकारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. याचा उद्देश या क्षेत्रात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य अबाधित राखणं हा आहे. एससीओमध्ये कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया, तजाकिस्तान, उझबेकिस्तान, भारत, पाकिस्तान हे सदस्य देश आहेत. तर अफगाणिस्तान, बेलारूस, ईराण, मंगोलिया हे एससीओतील पर्यवेक्षक देश आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख