राहुल गांधी नव्हे; हे तर राहुल लाहोरी : संबित पात्रांची कडवट टीका  - Not Rahul Gandhi; This is Rahul Lahori : Sambit Patra | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल गांधी नव्हे; हे तर राहुल लाहोरी : संबित पात्रांची कडवट टीका 

मंगेश वैशंपायन
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

राहुल गांधी हे पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवणार आहेत का?

नवी दिल्ली : पाकिस्तानातील वेब संवादात भारताची प्रतिमा खराब करणारे कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांचे नेते असलेले राहुल गांधी हे पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवणार आहेत का? असा तिखट सवाल भाजपने आज (ता. 18 ऑक्‍टोबर) विचारला.

हे असेच चालू राहिले, तर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस लवकरच पाकिस्तान राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये परावर्तित होईल, अशी टीका करताना सत्तारूढ भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींचा उल्लेख राहुल लाहोरी असा उपरोधिकपणे केला. 

शशी थरुर यांनी नुकतेच पाकिस्तानातील संवादात बोलताना ईशान्य भारतीयांना उर्वरित देशात मिळणारी वागणूक तसेच तबलिगी जमातीबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. यामुळे भाजपचा संताप झाला. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे थरुर हे उजवे हात मानले जातात, तेव्हा त्यांची भूमिका या दोन्ही नेत्यांना मान्य आहे का आणि तसे असेल तर राहुल गांधी पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवणार का? असे सवाल पत्रा यांनी विचारले. 

ते म्हणाले की राहुल गांधींना भारताची घृणा आहे. त्यामुळे ते सतत शेजारच्या देशांबद्दल चांगल्या पद्धतीने आणि भारताला अपमानास्पद वाटेल, अशी विधाने करत असतात. अखेर कॉंग्रेस आणि पाकिस्तान यांचे नाते नेमके आहे तरी काय? असा सवाल वारंवार उपस्थित व्हावा, असे त्या पक्षाच्या नेत्यांचे वागणे आणि बोलणे असते, हे भारताचे दुर्दैव आहे. 

तबलिगी जमातीचा उल्लेख पाकमध्ये करून भारतातील सरसकट मुसलमानांच्या अवस्थेबद्दल बोलण्याचा अधिकार थरूर यांना त्यांच्या पक्षाने दिला काय? ते पाकिस्तानात जाऊन राहुल यांना क्रेडिट देऊ इच्छितात काय? असा सवाल करून पात्र पुढे म्हणाले की भारताइतकी लोकशाही आणि नागरिक स्वातंत्र्य अधिकार जगात नाही. श्रीमती सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका गांधी यांनी पाकिस्तानातील अल्पसंख्याकाबद्दल आणि त्यांच्या अवस्थेबद्दल त्या देशाला विचारण्याचे धाडस केले आहे काय?, असा सवाल त्यांनी केला. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख