चेन्नई : दक्षिणेकडील प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक शंकर शण्मुगन यांच्याविरूध्द स्थानिक न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एन्थीरन' या चित्रपटाची कथा चोरली असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. लेखक अरूर तमिलनंदन यांनी शंकर यांनी तक्रार दाखल केली आहे.
चित्रपटामध्ये प्रसिध्द अभिनेते रजनीकांत व ऐश्वर्या रॉय बच्चन प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट 1 अॉक्टोबर 2010 रोजी प्रदर्शित झाला होता. तसेच त्यावर्षी हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा ठरला होता. चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. त्यानंतर हिंदीमध्ये रोबोट व तेलुगुमध्ये रोबो नावाने हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामध्ये रजनीकांत यांची दुहेरी भूमिका होती.
'एन्थीरन' या चित्रपटाची कथा आपल्या जिगुबा नावाच्या कथेची नक्कल असल्याचे अरूर यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांची ही कथा 1996 मध्ये एका नियतकालिकात प्रसिध्द झाली होती. चित्रपट प्रसिध्द झाल्यानंतर त्यातून कोट्यावधी कमाई झाली. अरूर यांनी त्यावर कथेच्या चोरीचा आरोप ठेवला. तसेच कॉपीराईट कायद्यांतर्गत त्याविरोधात तक्रार केली आहे.
अरूर यांच्या तक्रारीवरून न्यायालयाने शंकर व त्यांच्या वकीलांना अनेकदा न्यायालयात हजर राहण्याचे समन्स पाठविले. पण त्यानंतरही ते न्यायालयात उपस्थित न राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. आता या प्रकरणाची सुनावणी 19 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे शंकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
शंकर हे दक्षिणेतील प्रसिध्द दिग्दर्शक आहेत. एन्थीरनसह त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहे. मात्र, या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणी वाढल्याचे दिसते. न्यायालयाने वॉरंट बजावल्याने त्यांना न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे लागणार आहे.
Edited By Rajanand More

