दिल्ली पोलिसांची तलवार काही तासांतच म्यान; परस्पर निर्णय घेणे अधिकाऱ्याला भोवणार - No Order For Metal Lathis says Delhi Police After Cops' Photo Goes Viral | Politics Marathi News - Sarkarnama

दिल्ली पोलिसांची तलवार काही तासांतच म्यान; परस्पर निर्णय घेणे अधिकाऱ्याला भोवणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

हिंसाचारानंतर पूर्व दिल्लीतील शाहदरा येथील पोलिसांनी लाठीच्या आकाराची तलवार आणि ढाल तयार केली. याचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर काही तासांतच दिल्ली पोलिसांकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला.

नवी दिल्ली : हिंसाचारानंतर पूर्व दिल्लीतील शाहदरा येथील पोलिसांनी लाठीच्या आकाराची तलवार आणि ढाल तयार केली. याचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर काही तासांतच दिल्ली पोलिसांकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे शाहदरा पोलिसांना आपली तलवार म्यान करावी लागली आहे. दिल्ली पोलिस किंवा सरकारने असा कोणताही आदेश दिला नसल्याचे समोर आले आहे. परस्पर घेतलेला हा निर्णय संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना भोवण्याची शक्यता आहे.

प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. मात्र, या मोर्चादरम्यान दिल्लीत मोठा हिंसाचार झाला. काही ठिकाणी पोलिस व आंदोलक आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. आंदोलकांनी पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. तसेच पोलिसांकडूनही लाठीमार करण्यात आला. 

पोलिसांना लाल किल्ल्याच्या भिंतीवरून उड्या मारून आपला बचाव करावे लागला. काही ठिकाणी पोलिसांवर तलवार उगारण्यात आली होती. या हिंसाचारात सुमारे 400 पोलिस जखमी झाले आहेत. यातील बहुतेक जण आंदोलकांकडे असलेल्या हत्यारांमुळे हे जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

भविष्यात अशा घटनांपासून आपला बचाव करण्यासाठी शाहदरा येथील पोलिसांनी 'अॅन्टी स्वोर्ड स्कॉड' तयार केले. या पथकाचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. यातील पोलिस कर्मचाऱ्यांना विशिष्ट प्रकारची तलवार  हातात दिसते. पण ही तलवार लाठीच्या आकारीची असून नेहमीच्या तलवारीपेक्षा दुप्पट लांब आहे. पोलिसांच्या डाव्या हाताला सुरक्षेसाठी लोखंडी कवच दिसते. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांना जवळही फिरकता येणार नाही, अशी रचना करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांनी या पथकासह नवीन शस्त्रावर बोलण्यास नकार दिला होता.

पण, हा निर्णय स्थानिक पोलिसांनी परस्पर घेतल्याचे समोर आले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेत तातडीने निर्णय रद्द करण्यात आला. 'हे छायाचित्र शाहदरा जिल्ह्यातील आहे. स्थानिक पोलिसांना याबाबत विचारणा करण्यात आली आहे. वरिष्ठांना याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने निर्णय मागे घेण्यात आला. पोलिसांना अशी शस्त्र देण्याचा कोणताही विचार नाही,' असे दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख