ग्वाल्हेर : कोरोना लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज झालेली..सुमारे 940 आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार होती. पण दिवसभरात लसीकरण केंद्राकडे कुणीच फिरकले नाही. कारणही तसेच गंभीर असल्याचे समोर आले आहे. लस दिली जाणाऱ्या 940 जणांचा एकच मोबाईल क्रमांक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
देशपातळीवर कोरोना लसीकरण मोहिम सुरू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये देशातील आरोग्य कर्मचारी, पोलिस यांच्यासह अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. बहुतेकांना पहिला डोस देण्यात आला आहे. लवकरच दुसरा डोस देण्यासही सुरूवात होणार आहे.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील एका लसीकरण केंद्रात सोमवारी हा प्रकार घडला. या केंद्रावर सोमवारी 940 जणांना लस दिली जाणार होती. पण या केंद्रावरील सात बुथवर दिवसभरात एकालाही लस देण्यात आली नाही. या केंद्रावर आलेल्या 940 जणांच्या नावाच्या यादीसमोर एकाच मोबाईल क्रमांकाची नोंद होती. हा मोबाईल क्रमांक राजेश सक्सेना या आरोग्य अधिकाऱ्यांचा होता.
लसीकरणासाठी नोंद केलेल्या प्रत्येकाला मोबाईलवर संदेश पाठविला जातो. पण या यादीतील व्यक्तींच्या नावापुढे एकच मोबाईल क्रमांक असल्याने कोणालाही संदेश पोहचला नाही. त्यामुळे दिवसभरात एकालाही लस दिली गेली नाही. या प्रकारामुळे यंत्रणेचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.
यादीमध्ये आपला क्रमांक पाहून सक्सेना यांनाही धक्का बसला. ते म्हणाले, माझा नंबर या यादीत कसा आला माहित नाही. लस घेणाऱ्यांमध्ये माझे नावही नाही. मला सोमवारी दुपारी या केंद्रातून फोन आला. यादीत माझा नंबर असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यांनी यादी पाठवून यातील कोणाला ओळखता का, हेही विचारले. पण कोणीच ओळखीचे नव्हते, असे त्यांनी सांगितले.
लसीकरण अधिकारी डॉ. आर. के गुप्ता यांनी ही यादी भोपाळहून आल्याचे सांगितले. यादी स्थानिक प्रशासनाकडूनच भोपाळला पाठविली असेल. यामध्ये निष्काळजीपणा झाल्याचे दिसते. याची चौकशी केली जात आहे. आता नव्याने यादी तयार करून तातडीने लसीकरण केले जाईल, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.
Edited By Rajanand More

