no concession for these 30 cities in fourth corona lock down | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

चौथ्या लॉकडाउनमध्ये देशातील या तीस शहरांना नाही सूट

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 17 मे 2020

ज्या शहरांमध्ये लॉकडाउन नियम पूर्वीप्रमाणेच जारी राहणार आहेत, त्यांच्याच हद्दीमध्ये देशातील एकूण रुग्णसंख्येच्या ८० टक्के कोरोनाग्रस्त असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली : देशात 18 मे पासून  सुरू होणाऱ्या नव्या रंगरूपातील कोरोना लॉकडाउन ४.० मध्ये दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईसह देशाच्या बारा राज्यांमधील मुंबईसह ३० शहरे आणि महानगरांच्या क्षेत्रांमध्ये लॉकडाऊनचा नियमांमधून कोणतीही सूट मिळणार नाही, असे केंद्र सरकारने आज स्पष्ट केले. यामध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबई, ठाणे, पुणेसह महाराष्ट्रातील सर्वाधिक सात जिल्हे आहेत.

ज्या शहरांमध्ये लॉकडाउन नियम पूर्वीप्रमाणेच जारी राहणार आहेत, त्यांच्याच हद्दीमध्ये देशातील एकूण रुग्णसंख्येच्या ८० टक्के कोरोनाग्रस्त असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या आठवड्यातच लॉकडाउन-४ लागू होणार असे स्पष्ट केले होते. या काळात जेथे कोरोनाचा फारसा उद्रेक नाही, तेथील कृषी आणि आर्थिक व्यवहार तसेच उद्योग पूर्वपदावर करण्याचे सरकारचे धोरण आहे. मात्र बारा राज्यांमधील या ३० शहरांमध्ये महानगरांमध्ये मात्र सोशल डिस्टन्सिंगसह सारे नियम यापुढेही अमलात येणार आहेत.

दिल्ली, महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगाण, आंध्र प्रदेश, पंजाब तसेच ओडिशा या राज्यांचा यात समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ७, तमिळनाडूतील ६ गुजरात आणि राजस्थानातील प्रत्येकी ३, बंगालमधील २, पंजाब, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि ओडिशातील प्रत्येकी एका शहराचा समावेश आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, पंजाब, आदी सहा राज्यांनी लॉकडाउन या महिनाअखेरपर्यंत वाढवण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १२ राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांसह व्हिडिओ कॉन्फरन्स केली. या मोठ्या शहरांमधील परिस्थिती अशी आहे की लॉकडाउन ४ मध्येही तेथील कोरोना परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निरीक्षण आहे. यांमध्ये सामाजिक उद्रेकाची भीती सर्वाधिक आहे.
- - - - - - -
यांना मिळणार नाही सूट :

राजधानी दिल्ली
महाराष्ट्र : बृहन्मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, पालघर
तमिळनाडू : चेन्नई, तिरुवल्लूर, कुड्डालोर, चेंगलपट्टू, अरियालुर, विल्लुपुरम
गुजरात : अहमदाबाद, सूरत, बडोदा
राजस्थान : जयपूर, जोधपूर, उदयपूर
पश्चिम बंगाल : कोलकाता, हावड़ा
मध्य प्रदेश : इंदूर, भोपाळ
उत्तर प्रदेश : आग्रा, मेरठ
तेलंगण : हैदराबाद
आंध्र प्रदेश : कुर्नूल
पंजाब : अमृतसर
ओडिशा : बेरहमपूर

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख