मुख्यमंत्रिपदाबाबत नीतीशकुमारांचे मोठे वक्तव्ये : मी कोणताही दावा केलेला नाही  - Nitish Kumar's big statements about the Chief Minister's post: I have not made any claim | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्रिपदाबाबत नीतीशकुमारांचे मोठे वक्तव्ये : मी कोणताही दावा केलेला नाही 

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

लोकांनी एनडीएला स्पष्ट बहुमत दिले आहे आणि एनडीए सरकार स्थापन करेल असंही त्यांनी नमूद केले. 

पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मी कोणताही दावा केलेला नाही. त्याबाबतचा निर्णय "एनडीए' घेईल, असे बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी निकालाच्या दोन दिवसांनंतर मौन सोडत सांगितले. 

बिहार विधानसभा निवडणुकीत "एनडीए'ने बहुमत मिळविल्यानंतर राज्याला सरकार स्थापनेचे वेध लागले होते. मात्र, या वेळी भाजपने नीतीशकुमार यांच्या "जदयू'पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून तर्कवितर्क लढविले जात आहेत. कमी जागा असणारे नीतीशकुमार मुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? अशी चर्चा सुरू आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं तर ते त्यांच्यासाठी अपमानास्पद असेल, अशी टीकाही विरोधकांकडून होत आहे. 

भाजपकडून नीतीशकुमार हेच मुख्यमंत्री होतील, असे संकेत मिळत आहेत. पण, नीतीशकुमार भाजपच्या हातातील बाहुले बनणार का?, अशी चर्चा सुरू आहे. तसेच निकाल लागून 48 तास झाले तरी नीतीशकुमार यांनी पक्षाच्या कामगिरीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

दरम्यान नितीशकुमार येत्या सोमवारी किंवा आठवडाभरात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू होती. मात्र शपथविधीबाबत अजून काहीचं ठरलेले नाही. दिवाळीला होणार की छठपूजेला याबाबत काही ठरवलेलं नाही. सध्या निवडणूक निकालाची समीक्षा केली जात आहे. चारही पक्षाचे नेते उद्या बैठक घेणार आहेत, अशी माहिती खुद्द नीतिशकुमार यांनी दिली. लोकांनी एनडीएला स्पष्ट बहुमत दिले आहे आणि एनडीए सरकार स्थापन करेल असंही त्यांनी नमूद केले. 

नितीशकुमार हे दिवाळीतच येत्या सोमवारी भय्या दुजच्या दिवशी शपथ घेऊ शकतात, अशी जोरात चर्चा आहे. मात्र अजूनही त्याबाबत जाहीरपणे कोणी सांगितलेलं नाही. त्यांच्या शपथविधीबाबत राजभवनाशी अद्याप कोणताही संपर्क साधला गेलेला नसल्याचे सूत्राने सांगितले. 

दरम्यान, "एनडीए'चे निर्वाचित आमदार हे नीतिशकुमार यांची नेतेपदी निवड करतील आणि नंतर शपथविधीचा मार्ग मोकळा होईल. त्यानुसार "जेडीयू'च्या मुख्यालयात नीतिशकुमार हे निर्वाचित आमदारांची लवकरच भेट घेतील. 

यादरम्यान, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एच. आर. श्रीनिवास यांनी विजयी उमेदवारांची यादी राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे सादर केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख