नीतीश कुमार बनले सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री - Nitish Kumar took oath on seventh times as Bihar CM | Politics Marathi News - Sarkarnama

नीतीश कुमार बनले सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री

वृत्तसंस्था
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

जनता दल (यु)चे नेते नीतीश कुमार यांनी आज सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर भाजप नेते तारकिशोर प्रसाद व रेणू देवी यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली.

पाटणा : जनता दल (यु)चे नेते नीतीश कुमार यांनी आज सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर भाजप नेते तारकिशोर प्रसाद व रेणू देवी यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला मोठा विजय मिळाला. 

बिहारचे मुख्यमंत्रीपद नीतीश कुमार यांच्याकडेच सोपवले जाईल असे भाजपने आधीच स्पष्ट केले होते. त्यानुसार आज राज्यपाला फागू चौहान यांनी नीतीश कुमार यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य १४ जणांना मंत्रीपदाची शपथ दिली. अपेक्षेप्रमाणे भाजप नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्याकडे हे पद पुन्हा सोपविण्यात आले नाही. हा भाजपचा निर्णय असून आम्ही युती म्हणून एकत्र काम करु असे नीतीश कुमार यांनी सांगितले. 

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला १२५ जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी ४३ जागी जनता दल (यु) तर भाजपला ७४ जागा मिळाल्या आहेत. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजपचे बिहार प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत झाली होती. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस, डावे यांची महाआघाडी असे चित्र होते. एनडीने 125 जागा मिळवत स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे. याचवेळी महाआघाडीने 110 जागा मिळवल्या आहेत. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख