योगगुरू रामदेव बाबांना आता नेपाळचाही झटका! - Nepal stopped the distribution of coronil kits | Politics Marathi News - Sarkarnama

योगगुरू रामदेव बाबांना आता नेपाळचाही झटका!

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जून 2021

नेपाळच्या आयुर्वेद विभागाने हे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली : योगगुरू रामदेवबाबा (Ramdev Baba) यांच्या पतंजली (Patanjali) आयुर्वेद कंपनीच्या कोरोनील (Coronil) या औषधावरुन वाद निर्माण झाल्यानंतर नेपाळनेही त्यांना झटका दिला आहे. कोरोनीलसह पतंजलीची कोरोनावरील औषधांचे वितरण थांबवण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला आहे. ही औषधे कोरोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. (Nepal stopped the distribution of coronil kits )

भूताननंतर नेपाळ हा कोरोनील कीटचे वितरण थांबवणारे दुसरा देश ठरला आहे. पतंजली ग्रुपकडून नेपाळला भेट स्वरूपात कोरोनील कीट दिली आहेत. नुकताच उत्तराखंड सरकारने  कोरोनील या औषधाचा समावेश सरकारी कोरोना किटमध्ये (Covid-19 Kit) करण्यात आला आहे. याला इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) गंभीर आक्षेप घेतला आहे. याआधी हरियानातील भाजप सरकारने कोरोना किटमध्ये कोरोनीलचा समावेश केला होता. आता उत्तराखंडने त्याचे अनुकरण केले आहे. 

हेही वाचा : पायलट लवकरच भाजपमध्ये, माझं बोलणं झालंय! भाजपच्या नेत्याचा दावा

आता नेपाळने कोरोनील कीटचे वितरण थांबवले आहे. नेपाळच्या आयुर्वेद विभागाने हे आदेश दिले आहेत. कोरोनील कीट घेताना योग्य प्रक्रिया पार पाडण्यात आली नाही. कोरोनील कीटमधील गोळ्या आणि नाकात सोडण्यात येणारे ऑईल ही औषधे कोरोनावर परिणामकारक असल्याचे कोणताही पुरावा नाही. मात्र, या औषधांवर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आलेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आलं आहे. 

दरम्यान, योगगुरु रामदेवबाबा यांच्या कोरोनील या कोरोनावरील आयुर्वेदिक औषधावरून मोठा गदारोळ सुरू आहे. या औषधाला डब्ल्यूएचओची  मान्यता असल्याचा दावा रामदेवबाबांच्या पतंजलीने केला होता. मात्र, डब्ल्यूएचओने केलेल्या खुलाशानंतर हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले होते. या औषधावरुन इंडियन मेडिकल असोसिएशनने या प्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना जाबही विचारला होता. 

रामदेवबाबांच्या पतंजली उद्योगसमूहाने बनविलेल्या कोरोनील या कथित आयुर्वेदिक औषधाला मान्यता दिलेली नाही, असे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले होते. मात्र, त्याआधीच देशाचे आयुष मंत्रालय या औषधाला मान्यता प्रमाणपत्र देऊन मोकळे झाले होते. हे औषध जाहीरपणे सादर करताना डॉ. हर्षवर्धन व नितीन गडकरी यांच्यासारखे ज्येष्ठ केंद्रीय मंत्री हजर होते. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख