राष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर आघाडी - NCP takes lead on two seats in keral assembly election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर आघाडी

वृत्तसंस्था
रविवार, 2 मे 2021

केरळमध्ये 140 जागांसाठी मतदान झाले असून सुरूवातीचे कल लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ) च्या बाजूने आहेत.

तिरुअनंतपुरम : केरळ विधानसभा निवडणुकीचे कल डाव्यांच्या बाजूने आले असून पुन्हा डाव्यांची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. डाव्या पक्षांच्या आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही दोन जागांवर आघाडी घेतली आहे. मागील विधानसभा निवडणुकीतही पक्षाला दोन जागांवर विजय मिळाला होता. 

केरळमध्ये 140 जागांसाठी मतदान झाले असून सुरूवातीचे कल लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ) च्या बाजूने आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, एलडीएफ 84 जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेसचा सहभाग असलेल्या युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (युडीएफ)कडे 42 जागांवर आघाडी आहे. भाजप आघाडीला केवळ चार जागांवर आघाडी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पी विजयन पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 'एलडीएफ'सोबत असून दोन जागांवर आघाडी मिळाली आहे. मुख्यमंत्री विजयन यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असलेले ए. के. शशीधरन हे एलाथुर मतदारसंघातून 9 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. अपक्ष उमेदवार सुल्फीकर मायुरी यांच्यावर यांना त्यांनी मागे टाकले आहे. मागील निवडणुकीत शशीधरन यांचा 29 हजारांहून अधिक मतांनी विजय झाला होता. 

कुट्टनाड मतदारसंघात राष्ट्रवादीचे थॅामस के थॅामस यांनी 4 हजारांहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी केरळ काँग्रेसचे जेकब अब्राहम यांना मागे टाकले आहे. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत थॅामस के थॅामस यांचे बंधु थॅामस यांनी राष्ट्रवादीकडून निवडणुकीत लढवत जिंकली होती. पण 2019 मध्ये त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली होती. 

दक्षिणेत लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही मोदी फॅक्टर निष्प्रभ

कर्नाटक वगळता दक्षिण भारतातील इतर राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यात भाजपला अद्यापही यश आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही तमिळनाडू व केरळमध्ये जोरदार प्रचार केला होता. पण त्याचा काहीही परिणाम येथील मतदारांवर झाल्याचे दिसत नाही. मोदी फॅक्टर या निवडणुकीतही चालल्याचे दिसत नाही.

तमिळनाडूमध्ये 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत डीएमके व काँग्रेस आघाडीला 38 पैकी 37 जागा मिळाल्या होत्या. अण्णाद्रमुकला 2014 मध्ये 37 जागांवर विजय मिळाला होता. 2019 च्या निवडणुकीत अण्णाद्रमुकने भाजपशी आघाडी केली होती. त्याचाच फटका 2019 च्या निवडणुकीत बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत होते. भाजपशी आघाडी केल्याने मुस्लिम व ख्रिश्चन मते अण्णाद्रमुकपासून दुरावल्याचा दावा त्यांनी केला होता.

लोकसभा निवडणुकीत धडा घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपशी आघाडी करण्यात अनेक नेते अनुत्सुक होते. पण शशिकला यांच्या बंडाचा फटका बसू नये म्हणून भाजपशी आघाडी केल्याचे बोलले जाते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा फायदाही पक्षाला घ्यायचा होता. त्यानुसार पंतप्रधान मोदींच्या अनेक सभा तमिळनाडूत झाल्या. पण या निवडणुकीतलही मोदी फॅक्टर चालला नाही. त्यामुळे डीएमकेने सुरूवातीच्या कलांमध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे.

केरळमध्येही हीच स्थिती असून भाजपला जेमतेम दोन जागांवर आघाडी आहे. पंतप्रधान मोदी यांनी केरळमध्येही सभा घेतल्या होत्या. पण इथेही त्यांचा फारसा प्रभाव पडल्याचे दिसत नाही. मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी आवश्यक जागांवर मजबूत आघाडी घेतली आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख