मिट्टी सत्याग्रह यात्रेस प्रारंभ..16 राज्यांतील माती शेतकरी आंदोलक स्मारकाच्या पायाभरणीत वापरणार...  - National Alliances of People Movements Start the soil satyagraha yatra  | Politics Marathi News - Sarkarnama

मिट्टी सत्याग्रह यात्रेस प्रारंभ..16 राज्यांतील माती शेतकरी आंदोलक स्मारकाच्या पायाभरणीत वापरणार... 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 31 मार्च 2021

देशभरातील गावागावांतून माती घेऊन मिट्टी सत्याग्रह यात्रा गुजराथमधील दांडीपासून आणि मध्यप्रदेशातील राजघाटपासून दिल्लीकडे निघाली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील गावागावांतून माती घेऊन मिट्टी सत्याग्रह यात्रा गुजराथमधील दांडीपासून आणि मध्यप्रदेशातील राजघाटपासून दिल्लीकडे निघाली आहे. या यात्रेचे नेतृत्व जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय व नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर, ओरिसाचे पर्यावरण कार्यकर्ता प्रफुल सामंतरा, शेतकरी नेते डॉ. सुनीलम, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठबोरवाला, गुड्डी तिवारी आदीं करत आहेत. 

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मिट्टी सत्याग्रह यात्रेला काल दांडी (गुजराथ) आणि राजघाट, बडवानी (मध्यप्रदेश) पासून सुरवात झाली.या यात्रेत महाराष्ट्रात जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, राष्ट्रसेवा दल, युवा बिरादरी, किसान संघर्ष समिती, ऑल इंडिया स्टूडंट्स फेडरेशन, बहुजन संवाद, समाजवादी समागम व अन्य संघटना-आंदोलनांचे साथी सामील झाले आहेत. देशभरातील अनेक संघटना-आंदोलने स्थानिक पातळीवर मिट्टी सत्याग्रह जनसंवाद करत आहेत. ता. 12 मार्च ते 6 एप्रिल 2021 दरम्यान ‘मिट्टी सत्याग्रहा’चे आवाहन जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन 12 मार्च ते 29 मार्चपर्यंत देशभरात मिट्टी सत्याग्रह झाला.

शेतकरीविरोधी कायदे, गुंडाळण्यात आलेले कामगार कायदे, शेतकरी आंदोलनाच्या मागण्या, या विषयांवर व्यापक जनसंवाद साधला गेला. ऐतिहासिक स्थळे, स्वातंत्र्य आंदोलनातील महत्वाची ठिकाणे आणि सध्याच्या जनआंदोलनांच्या संघर्ष स्थळांवर झालेल्या या मिट्टी सत्याग्रहात त्या त्या ठिकाणची मूठभर माती हातात घेऊन संकल्प केला गेला. ती विविध ठिकाणची माती असलेला मातीचा कलश घेऊन आज मिट्टी सत्याग्रही दिल्लीला निघाले आहेत. महाराष्ट्रासह अन्यही राज्यांमधून हे कलश निघाले आहेत. आत्तापर्यंत 16 राज्यांतून माती एकत्रित करण्यात आली आहे. ही गावागावांतून संकलित केलेली माती दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करताना शहीद झालेल्या शेतकरी आंदोलकांच्या सन्मानार्थ उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या पायाभरणीत वापरण्यात येणार आहे. 

काल दांडी येथून सुरू झालेल्या यात्रेत जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचे कृष्णकांत, अखिल भारतीय किसान सभेचे डायाभाई गजेरा, लोकशक्ती अभियानाचे प्रफुल्ल सामंतरा, हम भारत के लोगचे फिरोज मिठीबोरवाला, खेडुत समाजचे रमेश पटेल, लोकायतचे तुषार, निश्चय, मंगल, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे आमिर काजी, बहुजन संवादच्या लता प्र.म., युवा बिरादरीच्या गुड्डी तिवारी व अन्य साथी, तर नर्मदा खोऱ्यातून निघालेल्या यात्रेत मेधाताई पाटकर यांच्यासह नर्मदा खोऱ्यातील शेतकरी, शेतमजूर, मच्छिमार यांचे प्रतिनिधी सामील झाले आहेत, असे जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय सुनीती सु.र यांनी सांगितले. 

दांडीमध्ये 100 गावांतून, बारडोलीमध्ये 50 गावांतून आलेली माती एकत्र करण्यात आली. उमराचीमध्ये यात्रेचे स्वागत करण्यात आले. भरूचमध्ये खेडूत हितरक्षक दल आणि मच्छिमार संघटनांनी यात्रेचे स्वागत केले. आणंद जिल्ह्यातील बोरसदमध्ये  यात्रेचा मुक्काम होता. आज यात्रा सरदार पटेल यांचे जन्मस्थान, करमसद आणि साबरमती आश्रमात जाईल. मोदी सरकार आपली जमीन (मिट्टी) आपल्यापासून हिसकावून अदानी-अंबानींसारख्या कार्पोरेट्सच्या हवाली करू बघत आहे, हे आम्ही कदापी होऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि या आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या 315 शेतकऱ्यांचे स्मारक बनवण्यासाठी गांधीजींची प्रेरणा आणि गांधीमार्गाने ही यात्रा निघाली आहे. गांधीजींच्या स्मारकापासून निघालेले मिट्टी सत्याग्रही 5 मार्चपर्यंत दिल्लीच्या सीमांवर पोहोचतील असे नियोजन आहे. 

Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख