नरेंद्र मोदी जेएनयूत जाणार ! विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार !  - Narendra Modi to go to JNU! To unveil statue of Vivekananda! | Politics Marathi News - Sarkarnama

नरेंद्र मोदी जेएनयूत जाणार ! विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार ! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

मागील वर्षी विद्यापीठात शुल्कवाढीविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान एका गटाने स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची मोडतोड केली होती.

नवी दिल्ली : डाव्या विचारसरणीचे केंद्रबिंदू मानले जाणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा बसविला जाणार आहे. गुरुवारी (ता. १२) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होईल. 

मागील वर्षी विद्यापीठात शुल्कवाढीविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान एका गटाने स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची मोडतोड केली होती. याप्रकरणी गुन्हाही नोंदविण्यात आला होता. त्यापार्श्वभूमीवर आता पूर्णाकृती पुतळा विद्यापीठात बसविला जाणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या सोहळ्यात पंतप्रधानांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रांगणात स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होईल.

 जेएनयूचे कुलगुरू एम. जगदीशकुमार यांनी निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. जेएनयूच्या फेसबुक पेजवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाईल. स्वामी विवेकानंद हे भारताचे बुद्धिवादी आणि आध्यात्मिक नेतृत्व होते स्वातंत्र्य, प्रगती, बंधुभाव आणि सलोखा या संदेशातून त्यांनी देशातील तरुणांना प्रेरणा दिली. एवढेच नव्हे तर भारतीय संस्कृती, सभ्यता आणि विकासवादी मानसिकतेबद्दल सर्वसामान्यांमध्ये अभिमान बाणविला, असे या निवेदनात म्हटले आहे. 

जेएनयूमध्ये स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव २०१७ मध्ये पुढे आला होता आणि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या सर्व सदस्यांनी एकमताने या प्रस्तावाला मान्यता दिली होती. मात्र, पुतळ्यासाठीच्या निधीवरून विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या एका गटाने प्रश्न उपस्थित केले होते. 

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष एन. साई बालाजी याने पुतळ्यासाठीच्या निधीबाबत माहिती अधिकार कायद्याद्वारे विचारणाही केली होती. तर, पुतळा उभारणीसाठी विद्यापीठाचा निधी वापरला जाणार नसल्याचे रेक्टर आर. पी. सिंह यांनी स्पष्ट केले आहे. 
 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख