नवी दिल्ली : खासदार राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाला अजूनही अध्यक्षपदासाठी चेहरा मिळालेला नाही. अनेक बैठका होऊनही अध्यक्ष शोधण्यात अपयश आल्याने अद्याप सोनिया गांधी याच कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. आता पुन्हा एकदा अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली असून गांधी कुटूंबाचे अत्यंत विश्वासू नेते व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव पुढे आले आहे. पण गेहलोत यांच्या नावाला काँग्रेसमधील एका गटाकडून विरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निवडणूकीतील अपयशानंतर राहूल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. शेवटी सोनिया गांधी यांनाच पुन्हा कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम सुरू करावे लागले. पक्षाला अद्याप पुर्णवेळ अध्यक्ष न मिळाल्याने काही नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. सतत बैठका होऊनही कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही. त्यामुळे पक्षांतर्गत मरगळ दिसून येत आहे.
'अमर उजाला' या न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, गेहलोत यांच्याकडे अध्यक्षपद सोपविण्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या एका गटाकडून ही माहिती दिली जात आहे. गेहलोत हे सध्या राजस्थानचे मुख्यमंत्री असले तरी गांधी कुटूंबाचे अत्यंत विश्वासू व जवळचे नेते मानले जातात. काँग्रेस पक्षासमोर आलेल्या अनेक अडचणींवेळी गेहलोत धावून आले आहेत. त्यामुळे सोनिया गांधी यांचा त्यांच्यावर खुप विश्वास आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठीही सचिन पायलट यांच्याऐवजी त्यांनाच पहिली पसंती देण्यात आली.
काँग्रेसमध्ये सध्या गेहलोत हे ज्येष्ठ नेते असून नव्या आणि जुन्या नेत्यांमध्ये समतोल राखण्यात गेहलोत तरबेज आहेत. मागील वर्षी गेहलोत यांना अध्यक्षपदासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. पण मुख्यमंत्रीपद सोडण्यास ते तयार नव्हते. आताही त्यांचे नाव चर्चेत असले तरी दिल्लीत जायचे की नाही, याचा निर्णय त्यांनाच घ्यावा लागणार आहे. त्यांनी होकार दिल्यास सोनिया गांधी यांच्याकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
ज्येष्ठ नेत्यांच्या पत्राने वाद चव्हाट्यावर...
काही महिन्यांपुर्वी पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पत्र पक्षातील 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिले होते. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली कपिल सिब्बल, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता.
या पत्राने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले. त्यानंतर पक्षाची तातडीची बैठक घेऊन या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. या नेत्यांचे समाधान झाल्याचा दावा अन्य नेत्यांकडून करण्यात आला. पण त्यानंतरही पक्ष नेतृत्वामध्ये बदल झाला नाही. काही नेत्यांनी सोनिया गांधी यांच्यावरच विश्वास व्यक्त केला. तर एका गटाने राहूल गांधींनाच पुन्हा अध्यक्ष करण्याबाबत मत व्यक्त केले होते.
Edited By Rajanand More

