नवी दिल्ली : शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी गाझीपूर सीमेवरील रस्त्यावर दिल्ली पोलिसांकडून खिळे ठोकण्यात आले आहेत. गुरूवारी हे खिळे काढतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी माघाल घेतल्याची चर्चा सुरू झाली. पण त्यावर दिल्ली पोलिसांनी लगेचच खुलासा केला. सर्वसामान्यांना त्रास होऊ नये म्हणून हे खिळे दुसरीकडे लावत असल्याचे सांगण्यात आले.
दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तसेच आंदोलकांना दिल्लीत घुसण्यापासून रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड्स, सिमेंटचे ब्लॉक लावण्यात आले आहेत. तारा लावून गाझीपूर सीमा पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या या सुरक्षाव्यवस्थेवर अनेकांनी टीका केली आहे.
#WATCH | Nails that were fixed near barricades at Ghazipur border (Delhi-UP border) are being removed. pic.twitter.com/YWCQxxyNsH
— ANI (@ANI) February 4, 2021
त्यानंतर गुरूवारी पोलिसांकडून खिळे काढण्यात येत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. दिल्ली पोलिसांकडून ही सुरक्षा व्यवस्था कमी केली जात असल्याची चर्चा सुरू झाली. पण त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यावर खुलासा केला. 'सीमेवरील सुरक्षा पूर्वीप्रमाणेच आहे. त्यात बदल करण्यात आलेला नाही. काही ठिकाणी लोकांना ये-जा करण्यात अडचणी येत असल्याने तेथील खिळे काढून इतर ठिकाणी लावले जात आहेत,' असे दिल्ली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांना अडविले
राष्ट्रवादी काँग्रेससेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक खासदार आज गाजीपूर सीमेवर, शेतकरी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले होते. मात्र, त्याना गाजीपूर सीमेवर अडवले. आंदोलनस्थळावर जाण्यापासून त्यांना रोखण्यात आले.
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी संसदेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी सुळे यांच्यासह देशभरातील अनेक खासदार दिल्लीच्या गाझीपूर बॅार्डवर शेतकर्यांच्या आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. मात्र, या सर्वांना दिल्ली पोलिसांनी या सीमेवरच अडविले.
शेतकरी आंदोलनाला भेट देण्यासाठी देशातील विविध राज्यातील दहा पक्षांचे खासदार एकत्र आले होते. सर्व खासदारांनी मिळून आंदोलनस्थळी जाण्यासाठी पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे सर्व खासदार आंदोलकांना न भेटताच परतले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी गाझीपूर सीमेला भेट दिल्यानंतर फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, गाझीपूर बॉर्डर, दिल्ली येथे गेली ७० दिवस आंदोलन करीत असलेल्या शेतकरी बांधवांना भेटण्यासाठी आम्ही काही खासदार गेलो होतो. परंतु आम्हाला त्यांना भेटू दिले नाही. गाझीपूर बॉर्डरचे दृश्य पाहून आपण नक्की भारतातच राहतो का असा प्रश्न पडला, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला.
Edited By Rajanand More

